Friday, 17 September 2021

भेटेन नऊ महिन्यांनी

 

                                                                                         जागर स्वातंत्र्याचा !
---------------------------------------------------------------------------------

भेटेन नऊ महिन्यांनी – कवी कुंजविहारी

भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु झाले. तेव्हापासून  स्वातंत्र्यपर कवनं मनात रुंजी घालायला लागली. अनेकांच्या भाषणातील, “कुसुमाग्रजांच्या विशाखा काव्यसंग्रहावर आमची पिढी वाढली”, हा संदर्भ पुन्हापुन्हा कानांमध्ये घुमू लागला. गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार, .....त्या थेंबातून उठतील भावी क्रांतीचे नेते, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, ने मजसी ने परत मातृभूमीला, वाढू दे कारागृहाच्या भिंतीची उंची किती; मन्मना नाही क्षिती अशा मनाच्या तळात बसलेल्या कित्येक कवितांच्या ओळी मनाच्या पृष्ठभागावर यायला लागल्या. या कवितांचा वेध घ्यावा, पुढच्या पिढीला ओळख करून द्यावी अशी ओढ लागली.

 आज १७  सप्टेंबर - ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन’. या निमित्ताने या संकल्पाला वाट मिळाली आहे. १७ सप्टेंबर  १९४८ रोजी हैदराबाद, निजामाच्या अधिपत्याखालून मुक्त झाले. भारत सरकारच्या पोलिस कारवाईने एका प्रदीर्घ संघर्षावर, शिक्कामोर्तब करून, तो संघर्ष संपुष्टात आणला. भारताच्या मध्यभागी कायमची विषारी सूत्र पेरण्याची निजामाची मनीषा धुळीला मिळाली. भारतीय स्वातंत्र्य पूर्णत्वास गेले.

या स्वातंत्र्य संग्रामात माझे आजोबा कै. विठ्ठलराव देसाई - देशपांडे हे प्रत्यक्ष लढलेले होते. माझे काका कै. ना.वि.देशपांडे यांनी त्यात सहभाग नोंदवला होता. ज्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अंगाखांद्यावर खेळत माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आज जिथं प्राध्यापक म्हणून मी वावरत आहे, त्या माझ्या कर्मभूमीला हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाचा उज्ज्वल इतिहास लाभलेला आहे. प्रत्यक्ष लढ्यात सहभागी होण्यापासून, समाज जडणघडणीच्या आणि समाजोद्धाराच्या विधायक कार्यात, देशाबाबत निष्ठा बाळगत प्रदेशाचे प्रश्न सोडवण्यात स. भु. शिक्षण संस्था नेहमीच अग्रेसर राहिली.

 या सगळ्या संदर्भांचा विचार करताना, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्याचा जागर करणं, काळानुरूप स्वत:च्या कर्तव्याचे, भूमिकेचे आत्मपरीक्षण करणे, त्यावर साधक-बाधक विचार करणे, हे माझे मला कर्तव्य वाटते. शिक्षणक्षेत्रासारख्या पवित्र आणि समाजाच्या मूलभूत विकासात भर घालणा-या क्षेत्राशी नातं सांगताना, ‘मागच्या पिढीनं दिलेलं हे कर्ज पुढच्या पिढीला परत करणं, हे मला आद्यकर्तव्य वाटते.’ म्हणून माझ्या मनाला भावणाऱ्या कविता या साहित्यप्रकाराच्या माध्यमातून, स्वातंत्र्याबद्दल आपल्याशी संवाद साधावा, असं निश्चित केलं.

पण कविता निवडायची तर नेमकी कोणती निवडावी? अनेक कविता मनामध्ये फेर धरून नाचायला लागल्या. शेवटी काहीतरी निश्चित करणं आवश्यक होतं. विचार करताना प्रकर्षाने जाणवले आपण लहानाचे मोठे झालो ते आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर ! किती गृहीत धरतो त्यांना आपण. आयुष्यात स्वयंपूर्ण पद्धतीने जगण्याची ताकद ते आपल्यामध्ये विकसित करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आईबद्दल, जन्माबद्दल, मातेबद्दल आणि मातृभूमीबद्दल बोलावं असं निश्चित केलं आणि कविता समोर आली भेटेन नऊ महिन्यांनी ! ही कविता आहे कवी कुंजविहारी यांची. कवी कुंजविहारी म्हणजे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी – सलगरकर. इ.स.१८९६ ते इ. स.१९७८ हा त्यांचा कालखंड.

मनि धीर धरी शोक आवरी जननी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

या न्यायाची रीत मानवी असते । खरी ठरते केव्हा चुकते

किति दुर्दैवी प्राणी असतिल असले । जे अपराधाविण मेले

लाडका बाळ एकुलता

फांशीची शिक्षा होतां

कवटाळुनि त्याला माता

अति आक्रोशे, रडते केविलवाणी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

आई-मुलाचे नातेच मुळात वात्सल्याचे, प्रेमाचे. या नात्याच्या ज्या अनेकविध कथा आपल्याला ऐकायला मिळतात त्यात प्रेयसीचे म्हणणे ऐकून आईचे काळीज काढून नेणा-या मुलाची मृत्युनंतरही चिंता करणा-या आईचे दर्शन घडते. गोविंदाग्रज तर सुरेखच लिहितात – ते ऱ्हदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते, त्याचे दु:खात काय होई? ते विलक्षण दु:ख या कवितेतही अनुभवायला मिळते.एकुलत्या एक मुलाला फाशीची शिक्षा होते तेव्हा आईचा आक्रोश परिसीमा गाठतो. आणि ज्याला फासावर जायचे आहे, मृत्यूला सामोरे जायचे आहे तो धैर्यशाली सुपुत्र आईचे सांत्वन करत आहे. ज्या मातृभूमीने मला पोसले ती पारतंत्र्यात असताना मी तरी स्वतंत्र, स्वेच्छा बाळगणारा कसा राहू शकेल?

लाभते जया, वीर मरण भाग्याचे । वैकुंठपदी तो नाचे

दे जन्म मला, मातृभूमिचे पोटी । पुन:पुन्हा मरण्यासाठी

मागेन हेंच श्रीहरिला

मातृभूमि उद्धरण्याला

स्वातंत्र्यरणी लढण्याला

तव शुभ उदरी, जन्म पुन्हा घेवोनी । भेटेन नऊ महिन्यांनी ॥

 

या भूमीसाठी, तिच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यात मला आनंदच आहे. माझे सर्वस्व मी तिच्या चरणी अर्पण केलेले आहे. हेच सद्भाग्य पुन्हा मिळण्यासाठी मला तुझ्या पोटी पुन्हा जन्म लाभू दे. ही परमेश्वराजवळ केलेली प्रार्थना तर आहेच, पण भेटेन नऊ महिन्यांनी हा व्यक्त केलेला आत्मविश्वास देखील आहे. देवाजवळ त्रासातून, संकटातून मुक्ती मागितलेली नाही तर या संकटाशी प्राणपणाने लढण्याचे आणि लढता लढता वीरगती प्राप्त झाल्यावर पुन्हा जन्म देण्याचे अभिवचन  मागितलेले आहे. ‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’, याचा सुंदर प्रत्यय देणारे हे एक मनाला भुरळ घालणारे काव्य आहे.

     मला आठवते माझ्या कॉलेजच्या असमंजस वयात मी मा.गोविंदभाईंना त्यांच्या एका मुलाखतीत विचारले होते, "देश पारतंत्र्यात होता तेंव्हा तुमच्यासमोर देशासाठी स्वातंत्र्य मिळवायचे, असे स्पष्ट उद्दीष्ट होते. आता तर सगळे व्यवस्थित चाललेले आहे. मग देशासाठी आम्ही वेगळे काही काय करणार?" ते भाईच. प्रश्नांना रेडीमेड उत्तरे देणे त्यांना कधीच आवडत नव्हते. विद्यार्थ्याला विचारप्रवण करावे आणि त्यातून कृतिप्रवणतेचा मार्ग त्याचा त्याने शोधावा, हे त्यांचे स्पष्ट मत होते. ते म्हणाले, “तुमच्या काळाचे प्रश्न तुम्हाला समजलेच पाहिजेत. हे प्रश्न सोडवण्याचा मार्गही निश्चित करता आला पाहिजे. आम्ही केले तेच तुम्ही करायचे असे नसते. भविष्याचा वेध घेत, वर्तमानाशी कालसुसंगतता राखत तुम्ही पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी भूतकाळाकडून प्रेरणा अवश्य घ्यावी.” गोंधळलेल्या माझ्या मनाला त्यांनी पुन्हा साध्या शब्दात समजावून सांगितले, “बाळ, आपण केलेले प्रत्येक कार्य ही देशसेवाच असते. फक्त ते प्रामाणिकपणाने, अथक परिश्रमाने साधलेले असावे. तुम्ही विद्यार्थी आहात. प्रामाणिकपणे अभ्यास करा. ती देशसेवाच आहे.” त्या प्रेमळ शब्दांनी केवळ माझ्या मनाचा गोंधळ दूर केला असे नव्हे तर मला जगण्याची एक स्पष्ट दिशा, ऊर्मी आणि बळ दिले. त्या बळावर हे बाळ वाटचाल करत इथवर आले. भाईजी आम्ही आपले ऋणी आहोत. आजच्या हैद्राबाद मुक्तिसंग्राम संग्राम दिनाच्या निमित्ताने आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करता येती आहे, हे सद्भाग्यच !        

प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी

सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग,

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.

-------------------------------------------------------------------------------------

                   मातृभूमीचा आणि मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे.                                   

मागणं हिंददेवीकडे !

  मागणं हिंददेवीकडे ! देवीचे नवरात्र सुरू आहेत. आज नवरात्रातली अष्टमी. अहोरात्र जागरण होणार. देवीपुढे  गोंधळ सादर केला जाणार. प्रत्येकाच...