बलसागर भारत होवो - साने गुरुजी
समूहगान सादर करताना ‘सावित्रीबाई
फुले महिला एकात्म समाज मंडळ’.
खरं म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या
आधीच हा लेख प्रसिद्ध व्हायला हवा होता. कारण जानेवारी महिन्यातला हा ‘स्वातंत्र्याचा
जागर’, पण बाकी व्यस्ततेमध्ये
कुठेतरी मागे पडला. व्यस्तता कितीही असली तरी नियोजित कामे ठराविक वेळी होणं
आवश्यक असतं. त्यामुळे माझ्या रसिक वाचकांची क्षमा मागून मी साने गुरुजींच्या या
स्वातंत्र्यपर गीताकडे वळते.
साने गुरुजी म्हणजे, ‘भारतीय सत्शीलतेचं मूर्तिमंत रूप’
वाटतं मला. साने गुरुजींनी इथल्या सामान्य माणसाचा, या देशाचा, या संस्कृतीचा इतका व्यापक आणि सूक्ष्म विचार केलेला आहे; शिवाय इतक्या साध्या सोप्या
शब्दांमधून व्यक्त केलेला आहे की त्याला खरोखरच तोड नाही. मला वाटतं मराठी
साहित्यामध्ये सोपं कसं लिहावं, असा प्रश्न पडला तर कितीही शतके उलटली तरी एकच नाव अग्रक्रमाने पुढे
येतं आणि ते म्हणजे 'साने गुरुजी'. साने गुरुजींच्या कथा असोत, कविता असोत, जनमानसाने आळवलेली गीतं असोत किंवा
कादंबऱ्या असोत त्यांच्या आंतरिक हाकेतून येणारा सघन, आशयगर्भ साधेपणा, अभिव्यक्तीतला सोपेपणा थेट
मनाला हात घालणारा.
ज्या ज्या वेळेला साने गुरुजींच्या
‘बलसागर भारत होवो’ या गीताचा विचार होईल, तेव्हा हे गीत जणू काही आत्ताच आणि आजच्या काळासाठी लिहिले आहे, असे वाटावे, इतके ते जीवंत,
रसरशीत आणि कालसुसंगत वाटते. साने गुरुजी यांचे साहित्य, त्यांचा काळ आणि त्यांचे संदर्भ हे
जवळपास आपल्याला माहिती आहेत. नवी पीढीही आपल्या पुस्तकांमधून, गुगल गुरुकडून ते माहीतही करून घेऊ शकते.
त्यामुळे माहितीचा हा तपशील वगळून या गीतातून कालसुसंगतता
शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा वाटतो आहे. तो याठिकाणी करून पाहते.
बलसागर
भारत होवो, विश्वात शोभुनी राहो |
मुळामध्ये भारताने बलसागर व्हायचं
म्हणजे काय? याचा विचार मी करत होते.
त्यावेळेला मला जाणवलं, 'ज्ञानाधिष्ठित भक्ती हे भारताचे वैभव आहे'. ज्ञानाधिष्ठित भक्ती हेच भारताचं
खरंखुरं आत्मबळ आहे. ‘सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी’ यांचा मेळ घालून समतोल साधत, ‘जगा आणि जगू द्या’ हे
तत्त्व अवलंबत समाधानी वृत्तीने जगणारा भारत आजच्या काळातही विश्वाचा आधार होऊ
शकतो. पण तो कसा? यानिमित्ताने थोडा विस्ताराने विचार करूयात.
अर्थात सानेगुरुजींनी पुढे
स्पष्ट केलेले आहेच –
हे
कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ||
म्हणजेच ‘जिंकू किंवा मरू’, ‘करा किंवा मरा’, Do or die असं हे गणित
आहे. ‘कंकण करि बांधियले’ म्हणजे ‘व्रत घेतले’. ‘व्रत’ काही भारताला नवीन नाही. आमच्या लोकपरंपरेतल्या, सामान्य माणसाच्या जीवनातल्या अनेक व्रतकथा असतील, किंवा आर्य चाणक्यांसारखी, व्यक्तिगत जीवन आणि राजकीय जीवनात कार्य करतांना अगदी तेलाचा दिवा
बदलणारी ‘व्रतस्थ’ माणसं असतील किंवा 'न घेतले हे व्रत आम्ही
अंधतेने', असे म्हणणारे कृतिशील सावरकर असतील, विवेकाच्या बीजातून
घेतलेले व्रत आमच्या जीवनाचे मूल्य होते, निष्ठावंतपणे आम्ही ते
पाळत जातो आणि त्यातून सर्वकल्याणकारी कृती साकारली जाते, हा भारताचा अनुभव आहे. परंपरेचे प्रेरणादायी संचित आहे.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे
तर आमच्या परंपरेचे ब्रीद आहे. आणि म्हणूनच थेट अकराव्या - बाराव्या शतकापासून
जनसेवेच्या माध्यमातून भारतामध्ये उद्बोधन - प्रबोधन फार मोठ्या प्रमाणावर घडवून आणलेले दिसते. भक्ती चळवळीचा विचार केला तर लक्षात यायला लागतं
‘बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणुनी कळवळा येत असे’ अशा आंतरिक तळमळीतून आमच्या सर्व
संतांनी कार्य केलेले आहे. हे कार्य करताना, समाजाचा विरोध, प्रतिकूलता, समाजाची
संकुचित दृष्टी आणि नेतृत्वाची विशाल दृष्टी यांच्यामधला संघर्ष याने जे काही अंतर
निर्माण केलेलं होतं, या अंतरामुळे फार मोठ्या प्रमाणावर संतांची आणि समाजसुधारकांची
ससेहोलपट झालेली आपल्याला दिसून येते. त्यातूनच मग ‘जया अंगी मोठेपण तया यातना
कठीण’, ‘चणे खावे लोखंडाचे तेंव्हा
ब्रह्मपदी नाचे’ अशा प्रकारची उद्धरणे हा आमच्या समाजधारणेचा एक भाग बनलेली दिसून येतात.
पण यामुळे आपण जनसेवा सोडून दिली
आहे का ? आजही अशी अनेक माणसं, संस्था, संघटना आहेत जी या जनसेवेला सर्वस्व मानतात. ‘जनसेवा’ ही एक
प्रवृत्ती असल्याचा प्रत्यय देतात. अशाच एका संस्थेला भेट देण्याचा योग ‘मराठी
राजभाषा दिना’च्या निमित्ताने आला होता. ती संस्था म्हणजे ‘सावित्रीबाई फुले महिला
एकात्म समाज मंडळ’. प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेले असले तरी दिवाकर दादांमुळे
या संस्थेबद्दलची जी आपुलकी, आस्था आणि आदर मनात आपसूक निर्माण झालेला आहे;
त्यातून या कार्यक्रमाशी प्रेक्षक म्हणून मी कधी एकरूप झाले, ते मलाच कळले नाही. सूत्रसंचालकांचे
थक्क करणारे सूत्रसंचालन, ही स्पर्धा आहे, याचे भान विसरून आनंदाच्या पातळीवर घेऊन
जाणारे कलाकारांचे सादरीकरण, हेडगेवार रुग्णालयातील त्या सभागृहाला लाभलेले
मूल्यनिष्ठ, ध्यासयुक्त निखळ आनंदाचे वातावरण... मला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
त्या दिवशी कुसुमाग्रजांची शपथ घेऊन मी जाहीर केले, “माझ्या आजवरच्या आयुष्यात
एवढा सुंदर मराठी राजभाषा दिन मी अनुभवलेला नाही.”
पण इथे मला अशा अननुभूत
आनंदाची प्रचिती का यावी? मी जरा शोधत गेले आणि मला गवसले, या संस्थेने गेल्या तीन
दशकांपासून जे निरामय जनसेवेचे व्रत घेतलेले आहे, त्याचा हा परिपाक आहे.
कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद
पावना’. एखाद्या कार्यामधून ईश्वरी आनंदाचा प्रत्यय येतो, तो कार्यकर्त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे. १९८९ मध्ये आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार
यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक लक्ष सेवाकार्य उभे राहतील, असा संकल्प राष्ट्रीय
स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून
प्रेरणा घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही तरुण डॉक्टरांनी स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरू न करता
वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्याचे निश्चित केले. त्यातून १९८८
मध्ये डॉ.
बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान स्थापित झाले. या मार्फत चालणाऱ्या
संस्था, प्रकल्प, उपक्रम कार्यकर्त्यांच्या
समर्पित वृत्तीचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. १९८९ मध्ये मिलिंदनगर या सेवा वस्तीमध्ये ‘गुरुवर्य लहुजी साळवे
आरोग्य केंद्र’ उभे करण्यात आले. आज ६० सेवा वस्त्यांमध्ये ०३ आरोग्य केंद्र आहेत.
ग्रामीण भागातील विस्तार कार्यासाठी एक स्वतंत्र विश्वस्त व्यवस्था म्हणून १९९४
मध्ये ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’ची स्थापना झाली. त्या अंतर्गत खालील
सहा प्रमुख क्षेत्रात कार्य केले जाते.
· आरोग्य व आरोग्य लोकशिक्षण
· शाश्वत ग्रामविकास
· बाल शिक्षण व अनौपचारिक शिक्षण
· कौशल्य विकसन
· नैसर्गिक संसाधन विकास
· आपत्ती सहाय्य
आज महाराष्ट्रातल्या ०५ जिल्ह्यांमधील २७० गावांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम, प्रकल्प राबवले
जातात. महिलांचे सक्षमीकरण, विद्यार्थी विकास प्रकल्प, किशोरी विकास प्रकल्प, श्रीगुरुजी
चलचिकित्सालय, जलसंवर्धन आदी विविध कार्यांना समाजाचा मोठा व्यापक पाठिंबा मिळालेला आहे.
समाजाने स्वतःच्या समस्या स्वतः सोडवाव्यात, परस्पर
सहकार्याने सोडवाव्यात म्हणून हे कार्य सुरू झाले. संस्थेच्या कामाचा आधार घेऊन
स्वतःचे जीवन उन्नत केलेले आणि स्वतःच्या
कार्य कौशल्याचे योगदान देणारे अनेक
कार्यकर्ते इथे जीव ओतून काम करतात. त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून ‘वारसा
लोकसंस्कृतीचा’ सांगणारे ‘देवगिरी रेडिओ केंद्र 91.2’ हे या वर्षी २६
जानेवारीपासून सुरू
करण्यात आलेले आहे. भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, ते जनतेपर्यंत साध्या-सोप्या
भाषेतून जावे, लोकसंस्कृती रुजावी, कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख व्हावी अशा उद्देशांनी देवगिरी रेडिओ केंद्र कार्यरत आहे.
भारताने बलसागर व्हायचं म्हणजे काय
करायचे ? हा विचार जानेवारी महिन्यापासून ब्लॉग लेखनाच्या निमित्ताने माझ्या मनात
घोळत होता. मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या वरील कार्यक्रमात नेमके साने
गुरुजींचे हे गीत समूहगान म्हणून गायले
गेले. तिथे केवळ शब्दांचा नव्हे तर मूर्त रूपाने या गीताच्या अर्थाचा प्रत्यय आला.
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीदिनी आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी व्यापक
संवेदनशीलतेने, सामाजिक बांधीलकेने चालणाऱ्या या संस्थेच्या कार्याची छोटीशी ओळख
मला करून देता आली, यासारखा आनंद नाही.
सानेगुरुजी पुढे गीतात म्हणतात,
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पिन तिमीर
घोर संहारीन,
या बंधु सहाय्याला हो
हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून,
ऐक्याचा मंत्र जपून,
या कार्य करायाला हो
‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’त हा आत्मीयतेचा कार्यानंद आपण अवश्य घेऊ शकतो. सहभागी होऊ
शकतो. याबाबत अधिक माहिती या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री विजय उकलगावकर देऊ
शकतील. (संपर्क क्रमांक – 7875555944).
कोरोनाच्या काळाने जीवनातला साधेपणा, जीवनातली
प्रामाणिकता याकडे आपण पुन्हा एकदा बघायला लागलो आहोत. भारताच्या दृष्टीने मला ही
फार सकारात्मक बाब वाटते. भारतीयांसाठी ‘राष्ट्र’ ही केवळ भौगोलिक किंवा राजकीय
नव्हे तर एक सांस्कृतिक संकल्पना आहे. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून, सर्वस्वाचा
होम करून समाजाच्या कल्याणासाठी झटणारी माणसं भारतात आजही आहेत. आणि या माणसांप्रती सामान्य माणसाचा
असलेला विश्वास भारतीय वैभवाचा आधार आहे.
साने गुरुजी, आपण या गीतातून मागणे मागीतलेत -
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
बलसागर भारत होवो
भारताचा प्रत्येक नागरिक या व्रताशी एकनिष्ठ आहे.
वृंदा आशय
.....खरोखरच या सर्व संघटनांचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे ...त्यांच्या समर्पण भावनेला शतशत नमन !
ReplyDelete