ने मजसी ने परत मातृभूमीला...
(आजच्या संदर्भात)
पुनश्च हरि ॐ म्हणल्यानंतर
आता राहिलेल्या सर्वच कामांना पुन्हा एकदा हाती घेतलेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर
महिन्यामध्ये ‘जागर स्वातंत्र्याचा’ या नावाने ब्लॉग लेखन सुरू केले होते. त्यात
आत्तापर्यंत पाच स्वातंत्र्यपर कवितांचे विवेचन आपण वाचलेले आहेत. शेवटच्या
ब्लॉगमध्ये आपण भेटलो होतो, कुसुमाग्रजांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्थात १० मार्च २०२२ रोजी. ‘बलसागर भारत होवो’ या साने गुरुजींच्या गीताचे विश्लेषण त्या वेळी केले होते. आज त्यापुढील सहावा ब्लॉग
लिहित आहे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ या वि. दा. सावरकरांच्या गीतावर.
‘ने
मजसी ने’ या गीताच्या शब्दांची नुसती आठवण जरी झाली तरीसुद्धा आठवणींमध्ये चढाओढ
लागते, कोणत्या आठवणीने आधी यायचं? ‘सावरकरांचे व्याकूळ शब्द’, ‘मंगेशकर भावंडांचं गीत-संगीत’ की या कवनाने जागी होणारी
राष्ट्रभक्ती, पराक्रमाची आस...
भारतमातेच्या प्रेमाने उचंबळून येणाऱ्या संवेदनशील मनात या सगळ्या भावभावनांच्या
लहरी संमिश्रपणे धावत येतात. मनाच्या संमिश्र अशा भावविभोर अवस्थेमध्ये आपण हरवून
जातो. १९०९ मध्ये जिथे हे गीत लिहिलं गेलं त्या ब्रायटनच्या समुद्रकिना-याहून
आपल्या मनाचा एक प्रवास सुरु होतो. या गीतामध्ये रममाण होताना माझ्या मनानेही असाच
प्रवास केला थेट १९०९ पासून २०२२ पर्यंत. अर्थात पारतंत्र्याच्या काळापासून
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापर्यंत ! भूतकाळाच्या गौरवात आणि भविष्यकाळाच्या
चिंतेत न हरवता 'वर्तमान क्षणात जगा' हा मंत्र देणा-या भारतीय संस्कृतीला वंदन करत, या
गीताच्या पूर्वीच्या आवश्यक संदर्भासहित आजच्या संदर्भात चिंतन व्यक्त करण्याचा
प्रयत्न करते.
राष्ट्रभक्त,
विज्ञाननिष्ठ, साहित्यिक, क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळात प्राण पणाला लावून, उदात्त ध्येय उराशी
बाळगून परकीयांसोबतच स्वकीयांचाही विरोध पचवत, मोडीत काढत स्वत:च्या बुद्धीला
पटलेल्या आणि हृदयाने साद घातलेल्या मार्गावर अढळ
निष्ठेने ते अविरत चालत राहीले. स्वातंत्र्योत्तर काळातही स्वत:च्या वाट्याला
आलेल्या उपेक्षेची त्यांनी उपेक्षा केली. निर्भीडपणाने आणि निर्मोही मनाने राष्ट्रहिताचे कृतिशील विचार त्यांच्या जीवनातून
अभिव्यक्त होत राहीले. ते नितळपणाने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
त्या
काळाचा विचार करता लक्षात येते, स्वातंत्र्य मिळवायचेच या विचाराने भारलेले युवक
परदेशातून स्वदेशाच्या भवितव्यासाठी स्वत:चे सर्वस्व झोकून देत होते. ‘पारतंत्र्यात
राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असे मानणाऱ्या लंडनमधील
‘इंडिया हाऊस’ मधून हे क्रांतिकार्य सुरू होते. मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट, सावरकर,
वीरेन्द्रनाथ चटोपाध्याय इत्यादी क्रांतिकारक इथून कार्यरत होते. सावरकरांनी भाषांतरित करून पाठवलेले जोसेफ मॅझेनीचे
आत्मचरित्र सरकारसाठी प्रक्षोभक ठरले. मदनलाल धिंग्रा यांनी केलेल्या कर्झन वायलीच्या हत्येने इंग्रजांची करडी नजर
वाढली आणि लोकमतही विरोधात गेले. वि. दा. सावरकरांनी मदनलालच्या निषेधाला विरोध
केल्यामुळे सर्वांच्या वक्र नजरा सावरकरांकडे वळल्या. बाबाराव सावरकरांकडे
बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडल्यामुळे इतर आरोपांसह त्यांना
जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची
सूत्रे लंडनमधून हलवण्याची शक्यता संपुष्टात आली. कुटुंबाची वाताहत, विरोधी लोकमत,
राष्ट्रकार्याची हानी, शत्रूच्या हातात सापडून परदेशात अडकून पडण्याची शक्यता या
सर्व प्रतिकूल आघातांनी मातृभूमीच्या विरहाची व्याकूळ साद, ‘ने मजसी ने’ या
काव्यातून व्यक्त होते.
‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीतामधून सावरकरांनी
सागरावर व्याकूळ अंत:करणाने वचनभंगाचा आरोप केलेला आहे. जणू काही सागराने परत
मातृभूमीत आणण्याच्या बोलीवर सावरकरांना परदेशात नेले. मात्र ही शक्यता नाहीशी
झाल्यावर पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटाची किंवा पारध्याच्या जाळ्यात अडकलेल्या हरणाची
हतबलता सावरकरांनी अनुभवली. परतीच्या साऱ्याच शक्यता संपुष्टात आल्याने त्यांना
दाही दिशांना अंधाराचे साम्राज्य भासले. आपला हा विरह संपवून सागराने आपल्याला मातृभूमीकडे
परत न्यावे यासाठी नदीची शपथ ते सागराला देतात. नदीच्या विरहाने सागराच्या
अस्तित्वावरच गदा येईल त्या विरहाच्या कठोर शपथेलाही सागराने दाद दिली नाही. तेंव्हा
सागराच्या फेसाळत्या लाटा पाहून हा जणू काही आपली खिल्ली उडवत निर्दय हास्य करत
आहे, असे सावरकरांना वाटते. आणि मग मात्र विनंती करणा-या सावरकरांची भूमिका आक्रमक
होते. ‘आंग्लभूमी-भयभीता’ अशी सागराची निर्भत्सना करत, अगस्ती ऋषी तुला पुन्हा धडा
शिकवतील अशी धमकी ते सागराला देतात.
मी जेंव्हा आजच्या संदर्भात या काव्याचा विचार करते तेंव्हा
मला वाटते, सावरकरांची मातृभूमीकडे परतण्याची ही व्याकूळ ओढ आपल्यापैकी
प्रत्येकाला लागली पाहिजे. सावरकरांनी सागराला विनंती केली होती, ती आपल्याला
‘भवसागरा’ला करावी लागेल.
ने मजसी ने परत मातृभूमीला
भवसागरा प्राण तळमळला
अशी व्याकूळ साद घालावी लागेल. कदाचित या ओळींनी कोणी
गडबडून जाईल. कोणाला वाटेल या ओळी NRI साठी
वापरायच्या असतील. कारण भारतामध्ये राहूनच जर आम्ही आमचे जीवन जगतो आहोत
तर ‘परत मातृभूमीला ने’ असे म्हणण्याचे कारण काय ?
वास्तविक पाहता आपण भौतिक आणि भौगोलिक दृष्ट्या भारत
नावाच्या भूमीवर राहत असलो तरी सांस्कृतिक दृष्ट्या या मातीशी असलेली आपली नाळ
तुटत चाललेली आहे, हे कटू सत्य आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरातपासून
अरुणाचल प्रदेशपर्यंत दिसणारा
केवळ राजकीय नकाशा म्हणजे भारत नव्हे. ‘भारत’ हे सर्वसमावेशक असे एक ‘सांस्कृतिक
अस्तित्व’ आहे. मानवतेने जी गौरवाने जोपासावी अशी ‘भारत एक अस्मिता’ आहे. ज्याचा
मागोवा आणि मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करावे असे ‘भारत एक संचित’ आहे. शांततेने
आणि सौहार्दाने जिथे नांदता येईल असे अखिल विश्वाचे ‘भारत एक भवितव्य’ आहे. हे
भारताचे अलंकारिक वर्णन नव्हे. तर चंगळवादाच्या मस्तीत आणि दारिद्रयाच्या खाईत
आम्हाला अनाकलनीय राहणाऱ्या भारताचे वास्तव आहे. म्हणूनच भवसागराला विनंती आहे
-
ने मजसी ने परत मातृभूमीला
भवसागरा प्राण तळमळला
सावरकर राजकीय पारतंत्र्याच्या
काळात परक्या देशात प्रत्यक्षात अडकले होते, म्हणून त्यांची तळमळ आपण समजून घेऊ
शकतो. राजकीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या काळात पण अद्यापही न ओसरलेल्या
आत्मिक पारतंत्र्याच्या भरात स्वत:ची तडफड देखील आम्हाला जाणवत नाही, असे बधीरपण
स्वीकारून आम्ही विकासाच्या गप्पा मारत जगतो आहोत. कृत्रिम लखलखाटात मंदावत
जाणाऱ्या अंतरातल्या नंदादीपाचे आम्हाला भान नाही. मातृभूमीच्या विरहाने दशदिशा
तमोमय वाटणारे, उंच प्रासादांपुढेही आईची झोपडी प्रिय वाटणारे वि. दा. सावरकर
लिहितात -
गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें
जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
शिकली
– सवरलेली, सुशिक्षित आणि सुसंस्कृत देखील म्हणवली जाणारी आम्ही माणसे असा अगणित
व्यर्थ भार वाहतो आहोत, ओझ्याच्या जाणिवेशिवाय ! ही जाणीव जेंव्हा आम्हाला होईल
तेंव्हा व्यर्थ ओझे टाकून अर्थपूर्ण, उद्धारक जीवन आपण जगू शकू. ही जाणीव
तीव्रतेने होण्यासाठी मातृभूमीकडे परतण्याची ही व्याकूळ ओढ आपल्यापैकी प्रत्येकाला
लागली पाहिजे.
मातृभूमीकडे परतायचे म्हणजे काय ?
मातृभूमीकडे
परतायचे म्हणजे काय ? या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर आहे, ‘भारतीय’ व्हायचे.
कागदोपत्री आपली नोंद भारतीय म्हणूनच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आपली मानसिकता
‘वसाहतीकरणाची मानसिकता’ म्हणून ओळखली जाते. पारतंत्र्याच्या काळाने इंग्रजी
राजवटीला आवश्यक तेवढा भौतिक विकास आपल्याला दिलेला असला तरी त्याच्या कैक पटीने
आपले मानसिक खच्चीकरण केलेले आहे. न्यूनगंडाने पछाडलेले आपण भारतीय दृष्टिकोनातून,
भारतीय पद्धतीने जीवन जगायचे म्हणजे मागासलेपणा मानायला लागलो. हातचे आणि पारंपरिक
हक्काचे सोडून पळत्याच्या पाठीमागे
चालताना आपणच आपली त्रिशंकू अवस्था करून घेतली. ‘न घर का; न घाट का’ या स्थितीत
आपल्याला सुयोग्य स्वाभिमान, अस्मिता या साऱ्यांचा विसर पडला. घाबरत, दबकत जगताना
माझे मत काय, माझी भूमिका काय, कोणत्या मूल्यांशी आणि तत्त्वांशी माझी बांधिलकी
आहे, याच्या निश्चिती अभावी काय स्वीकारावे आणि काय नाकारावे याचे भान आणि हिंमत
आम्ही हरवून बसलो. ते धैर्य आम्हाला मिळावे म्हणून, ‘ने मजसी ने परत
मातृभूमीकडे..’
मनाचे सामर्थ्य जोपासणे आणि या सामर्थ्याने
पोलादी शरीर घडवणे ही भारताची सवय आहे. मनाच्या अफाट सामर्थ्याने पोलादी शरीर
घडवण्याची ताकद इथल्या लोकांमध्ये आली. या मन:शक्तीने देशभक्ती करणे आणि
विश्वकल्याण साधणे हा भारताचा स्वभाव झाला. आम्हाला मनोभावे त्याचे पाईक होता आले
पाहिजे, इतकेच. ज्या आध्यात्मिकतेच्या पायावर भारतीय संस्कृती दृढपणाने उभी आहे,
ती यापेक्षा निराळी असेल, असे वाटत नाही.
ही माय निजपदा लाहो;बलसागर
भारत होवो
हे साने गुरुजींचे मागणे मागच्या
लेखात आपण जाणून घेतले होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ने मजसी ने ...
प्रा. वृंदा देशपांडे –
जोशी, मराठी विभाग,
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे
कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.


No comments:
Post a Comment