‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’, ‘चांदोबा चांदोबा भागलास का’, ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान; दादा
मला एक वहिनी आण’ ही बालगीते ऐकत, म्हणत आणि सादर करत आमची पीढी मोठी झाली. तेव्हा
ही गीते ग.दि. माडगूळकर यांची आहेत, हे माहीत असण्याचे आणि करून घेण्याचे कोणतेही
कारण नव्हते. गाण्याच्या तालावर डोलायचं आणि मजेत झुलायचं ते सुंदर वय होतं. आजच्यासारखा केवळ माहितीचाच बडिवार माजलेला नव्हता, त्यामुळं
खुलत-फुलत आणि कलांमध्ये रममाण होत आनंदाने जगणारा समाज होता.
पुढे अभ्यास करताना लक्षात आले, ज्यांच्या गीतांवर ‘रम्य ते बालपण’ आपण जगलेलो आहोत, त्या गीतांनी
जीवनाला एक गती आणि संगती मिळवून दिलेली आहे. ग.दि. माडगूळकर यांचं इतर साहित्य
वाचताना लक्षात आलं, ज्या सहजतेनं हा कवी मुलांना रमवतो त्याच सहजतेनं आयुष्याचं
तत्त्वज्ञानही सांगतो. हे तत्त्वज्ञान आयुष्याची सुसंगती लावून देतं. या महाकवीला
अवघा महाराष्ट्र ‘गदिमा’ या आद्याक्षरांनीच ओळखतो आणि जोपासतो. गदिमा हे नाव
उच्चारताच डोळ्यांसमोर येतात अजरामर कलाकृती ‘गीतरामायण’ आणि ‘गीतगोपाल’.
राम-कृष्णावरची गीते आळवत, भारतीय संस्कृतीच्या संचिताला साद घालणारा हा महाकवी वैश्विक
मूल्य देणारे विपूल लेखन करून गेला. त्यांच्या लेखणीच्या वैविध्याने बालगीते,
भक्ती गीते, लावण्या, भावगीते, देशभक्तीपर गीते, चित्रपट गीते या साऱ्या
क्षेत्रांना समृद्धता बहाल केली. गदिमांनी वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी मराठी
चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि बघता बघता अनभिषिक्त सम्राटपद निर्माण केलं. मराठी
चित्रपटात कथाकार, पटकथाकार, संवाद लेखक, गीतकार, अभिनेता, निर्माता अशा सर्व
क्षेत्रात ते वावरले. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर दोन हजार पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. मला
वाटतं जणू काही महाराष्ट्राचे हे वाल्मिकी पावित्र्याचा, मांगल्याचा, निखळ आनंदाचा कलश घेऊन अवघ्या
समाजावर सतत अभिषेक करत आहेत. राग-लोभाच्या विकृतींचा विसर पाडून निखळ आनंदाकडे
नेणाऱ्या गीतांनी गदिमांना अजरामर केले.
आज आनंद घेऊयात त्यांच्या एका
स्वातंत्र्यपर गीताचा – हे राष्ट्र देवतांचे –
हे राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्र-सूर्य नांदो स्वातंत्र्य
भारताचे !
भारताचे स्वातंत्र्य अक्षय्यपणे
टिकावे, अशी मंगलकारक कामना या कवीने केलेली आहे. ही एक केवळ कवी कल्पना किंवा
दिवास्वप्न निश्चितच नाही. हे भारताचे स्वातंत्र्य टिकू शकते, टिकणार आहे त्याला कारणीभूत आहे देशाचा आध्यात्मिक स्वभाव. हे
राष्ट्रच मुळी देवतांचे आणि प्रेषितांचे आहे. आपण नित्य-नियमित उपासना करतो त्या देवतांमध्ये गणपती, इष्ट देवता, सरस्वती, गुरू, कुलदेवता, ग्रामदेवता, वास्तुदेवता, पूजापाठ करणारे, माता-पिता, कर्मप्रधान देवता, आदित्य आदि ग्रहदेवता हे सगळे येतात. साऱ्या सृष्टीकडेच परमेश्वर
म्हणून पाहण्याची विशाल दृष्टी भारतीय संस्कृती देते. त्यामुळेच लता-वेली, वृक्षराजी, पर्वत, नद्या, समुद्र, प्राणी सारेच आम्हाला
पूजनीय आहेत. परस्पर अस्तित्वाचा आणि स्वातंत्र्याचा आदर करत जपला जाणारा हा
सौहार्दाचा भाव अखिल सृष्टीलाच बंधुत्वाकडे नेतो. हे ज्याला जपता येईल त्याचे
स्वातंत्र्य अक्षय्य राहणार नाही काय?
पण माणूसच तो शेवटी. इतक्या आदर्श
अवस्थेत कसा राहू शकेल? भांडण-तंटे होणारच. सगळ्या गरजा
जरी भागल्या तरी भांडणाचे नवनवीन कारणे शोधणारच. म्हणूनच तर इथला ढासळता तोल
सांभाळायला हे राष्ट्र देवतांबरोबरच प्रेषितांचेही आहे.
ईश्वराने पाठवलेले महापुरुष, संत प्रेषिताची भूमिका पार पाडत ईश्वराचा निरोप सामान्य माणसाला
देणारे आहेत. ‘मला काय त्याचे’, अशी उपरी भूमिका न घेता, ‘बुडती हे जन न देखवे
डोळा’ या कळवळ्याने हित चिंतणारे, साधणारे आणि मार्ग दाखवणारे आहेत.
आपल्या संस्कृतीत राजसत्ता ही ईश्वरी सत्तेचा, आणि राजा हा ईश्वराचा अंश मानला
गेलेला आहे. मात्र राजदंडापेक्षा धर्मदंड याठिकाणी मोठा आहे. याची उदाहरणं
आपल्याला राजांच्या, ऋषींच्या, संतांच्या उदाहरणातून पाहायला मिळतात. आणि म्हणूनच
इथल्या राजसत्तेला मूल्यनिष्ठतेचा पाया आहे.
प्रेषिताचा हा अनुभव आपण दैनंदिन
जीवनातही घेत असतो. अडचणीत असताना कोणी आपल्याला मदत केली की आपण म्हणतो, “काय देवासारखा
भेटलास तू मला !” 'पाचामुखी परमेश्वर' या लोकश्रध्देतून ग्रामपंचायतीच्या
रूपाने आमची न्यायदेवता कार्यरत दिसते. आताच्या माहिती युगाने, वयाचा महिमा संपुष्टात आणत ‘आज्ञाधारकता’ या
गुणाला तिलांजली दिलेली असली, तरी त्याच्या गांगरून टाकण्याचा वैशिष्ट्यामुळे आजही
आपल्याला कोणतेही निर्णय घेताना ज्येष्ठांशी सल्ला-मसलत करावी वाटते. खरं सांगते, अडचणीच्या वेळी, संकटाच्या काळी हे सगळेच आपल्याला
प्रेषित भासतात.
सर्व प्रकारच्या बदलांना सामावून
घेत आणि काळावर मत करत समृध्दतेने विकसित होत राहण्याची, एक विलक्षण क्षमता भारतीय
संस्कृतीच्या ठायी आहे. या क्षमतेचे बीज तिच्या मूल्याधिष्ठिततेमध्ये आहे. मला
वाटतं कदाचित म्हणूनच गदिमा या भारतभूचा गौरव करत सांगतात –
कर्तव्यदक्ष भूमी
सीतारघुत्तमाची....
या कर्तव्यदक्षतेचे भान बाळगत
पराक्रमाची रामायणे इथे घडत राहण्याची अपेक्षा ते व्यक्त करतात. जगामध्ये दहशत
निर्माण करणाऱ्या, महापराक्रमी, अन्यायी राजवटीला तिच्या दारात जाऊन, उघड युद्धात
पराभूत करून दंडित करण्याचे व्यक्त झालेले विलक्षण धैर्य आणि सामर्थ्य, हा रामायणाचा
गाभा आहे. एकट्या रामाला हे साध्य करणे अशक्य नव्हतेच; मात्र या कार्यासाठी सबंध
राष्ट्रातील आणि सर्व स्तरातील जनतेचे एकत्रीकरण करत, सामान्य माणसामधले शौर्य त्यांनी जागवले. सत्कार्यासाठी संघटनाचा हा
मार्ग दाखवणे, हा रामायणाचा संदेश आहे. कर्तव्यदक्षतेच्या या मुळांशी दृढ नाते
प्रस्थापित केले तरच आकाशी झेप घेण्याचे सामर्थ्य भारतामध्ये कायम राहणार आहे.
शिर उंच उंच व्हावे हिमवंत
पर्वताचे
कवीची ही अपेक्षा मातृभूमीच्या
ह्याच गौरवाकडे निर्देश करत आहे. कर्तव्यपथावरची ही वाटचाल सोपी नाही, कधीच नसते. उलट सत्याचा मार्ग अनुसरणारी, कर्तव्याला न चुकणारी वाट
ही अधिक सत्त्वपरीक्षा पाहणारी असते. गलितगात्र अर्जुन प्रत्येकाला स्वत:मध्ये कधी
ना कधी अनुभवायला मिळतोच. त्यानं कृष्णाचा शोध मात्र कधी थांबवू नये. अंत:करणातून
साद घातली की कृष्ण येतोच ! अनुभवातीत वाटणारे, पण त्या मार्गावर वाटचाल करताच
अनुकरणीय म्हणून गवसणारे केवढे मोठे संचित भारतीय संस्कृतीने मोठ्या विश्वासाने,
आपल्या हाती सोपवलंय! त्याचा दाखला देतच कवी सांगतात -
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
नात्यानं भाऊ असलेल्या, वृत्तीनं
परस्परांचे मित्र असलेल्या आणि प्रसंगी गुरू-शिष्य झालेल्या कृष्णार्जुनाच्या
संवादातून जे गीतामृत बाहेर आलेले आहे, हे अमृत, ही भगवद्गीता स्थल-कालाच्या सगळ्या मर्यादा पार करत अवघ्या विश्वाला
संजीवनी देणारी आहे.
हा देश स्तन्य प्याला गीताख्य
अमृताचे
असे कवी म्हणतात, त्या वेळेला आपसूक विनोबा आणि विनोबांची गीताई आठवते, ‘गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता’ या अजाण, अबोध जीवाची सगळी जबाबदारी आईच्या प्रेमाने आणि सामर्थ्याने भगवद्गीता घेते. गीतापरिवाराच्या माध्यमातून अवघा भारतच नव्हे तर परदेशी नागरिक देखील आजही या गीतासामर्थ्याचा प्रत्यय अनुभवत आहेत. हे गीतामृत भारताच्या स्वातंत्र्याला अक्षय्य केल्याशिवाय राहील काय ?
दिलबर के लिए दिलदार है हम
दुश्मन के लिए तलवार है हम
ही भूमिका घेऊनच कोणत्याही काळात माणसाला, समाजाला, देशाला वावरावे लागते. जो
सामर्थ्यवान असतो त्याचीच क्षमाशीलता अर्थपूर्ण असते. दुबळ्या लोकांनी, दुबळ्या
देशांनी व्यक्त केलेली क्षमाशीलता त्यांचा दुबळेपणा लपवण्याचे साधन होते. कदाचित
हेच सत्य इथे कवीच्या वाणीतून व्यक्त होते –
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
जिथे सामर्थ्य आणि संयमाचा मेळ झालेला
आहे, असे राष्ट्र म्हणजे भारत ! अनेकविध क्षेत्रात विक्रम
प्रस्थापित करणारे हे पराक्रमी राष्ट्र शांततेचे पुरस्कर्ते आहे. इथे सामर्थ्य आहे
पण सामर्थ्याचा गर्व नाही. आपली सत्ता आणि सामर्थ्य जनतेच्या कल्याणासाठी आहे,
याची स्पष्ट जाणीव राज्यकर्त्यांना आहे. राजसत्तेला असलेले ईश्वरी अधिष्ठान आणि
प्रजाहितदक्षता स्पष्ट करताना 'आज्ञापत्रा'मध्ये रामचंद्रपंत अमात्य लिहितात –
"...आपली सकल प्रजा निरुपद्रव
होत्साती धर्मपंथप्रवर्तक असावी, या प्रजेचे करूणेस्तव ईश्वरे
संपूर्ण कृपानुग्रहे आपणास राज्य दिले आहे, या ईश्वराज्ञेस अन्यथा केल्याने ईश्वराचा क्षोभ होईल; हे पूर्ण भय चित्तांत आणून राज्यमदारूढ न होतां सर्वकाल अप्रमत्त
होऊन प्रजेच्या हितकार्यी सादर असावे.''
हे राज्य कशासाठी, तर जनतेच्या
सेवेसाठी! जसं जागृत दैवत असतं तशी ही आमची जणू काही जागृत प्रथा आहे. सत्यासाठी,
ही प्रथा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रसंगी संघर्ष करावा लागला तरीही करावा. पिढ्यानुपिढ्या
ही मूल्यनिष्ठा प्राणपणाने जोपासली जाते तेव्हाच संयमी, पराक्रमी आणि न्यायनिष्ठुर
शिवप्रतापी नृसिंह इथे जन्मतात, घडतात ! ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीद
जागवणाऱ्या आणि गाजवणाऱ्या भारताचे स्वातंत्र्य अक्षय्य, चिरंतन राहणार नाही काय ? कवी
गौरवाने आणि आत्मविश्वासाने सांगतात,
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे.
भारताचे वैशिष्ट्य म्हणजे परंपरा
सांभाळताना तो त्यांना कधीच अंधपणाने जोपासत नाही आणि साचलेपणही येऊ देत नाही.
त्यामुळे कालानुरूपता व नित्यनूतनता हा
भारतीय संस्कृतीचा स्वभावधर्म आहे. अशा भारतीय संस्कृतीत
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
हे कवीचे मागणे आहे. जयगीत जागृतीचे
मागितलेले आहे. इतरांसोबत जिंकण्याचे, यशाचे, स्पर्धेतल्या प्रगतीचे
नाही. कारण आंतरिक जागृती हेच मूलभूत परिवर्तन आहे. या जागृतीच्या पाठोपाठ यश, प्रगती, उन्नती हे सगळे आपसूक येतात. मात्र
अजागृत अवस्थेमध्ये जर यश मिळालं, उन्नती झाली तर तिचा मद चढल्याशिवाय राहात नाही.
आणि म्हणून गदिमा म्हणतात येथे सदा निनादो जयगीत जागृताचे !
को जागर्ति ? असं विचारणारी
कोजागरी पोर्णिमा आज आहे. त्याचे उत्तर कृतीतून देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी
आहे. आपल्या कर्तृत्वाच्या प्रकाशाने भारत उजळला पाहिजे. प्रकाशात रत राहणाऱ्या या
देशाचे नाव, अस्तित्व, सामर्थ्य आपण सार्थकी लावलं
पाहिजे.
गदिमांचे १९७७ साली निधन झाले
तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहताना कवी कुसुमाग्रज म्हणाले, “महाराष्ट्र
सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावून नेला. माडगूळकरांच्या निधनाने मराठी
साहित्यातील उत्तम संस्कार मावळला आणि एक सुंदर संगीत हरपले.”
सुदैवाने गदिमांचे नातू श्री सुमित्र माडगूळकर यांनी गदिमांच्या साहित्य, चित्रपटांवर आधारित मराठी साहित्यातील पहिली मल्टिमिडीया वेबसाईट गदिमा डॉट कॉम १९९८ सालीच तयार केली. त्यामुळे कै. ग.दि.माडगूळकरांचे सर्व साहित्य आपल्याला आजही एकाच ठिकाणी वाचता, ऐकता येते. युवा पिढीतल्या साहित्य रसिकांनी तर त्यासाठी सुमित्र दादांचे ऋणी राहिले पाहिजे. त्यांनी दिलेल्या अनुमतीनुसार हे संकेतस्थळ याठिकाणी नोंदवत आहे.
गदिमा
यांच्यावरील संकेतस्थळ
साहित्य रसिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. काही गोष्टी शाळा-महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात नसतील तरी आयुष्याच्या अभ्यासक्रमात आपण लावून घेतल्याच पाहिजेत, कारण त्या आयुष्य समृद्ध करणाऱ्या असतात.
प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी, मराठी विभाग,
सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.
---------------------------------------------------------------
मातृभूमीचा आणि मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे.
