(जन्म –१५ मार्च १८६६ ; मृत्यू – ०७ नोव्हेबर १९०५)
पद्यपंक्तीची तरफ आमुच्या
करी विधीने दिली असे
टेकूनी ती जनताशीर्षावरी जग उलथूनिया देऊ कसे (स्फूर्ती , केशवसुत)
असा पराकोटीचा आत्मविश्वास बाळगणारा हा कवी समाजाला त्याच्या जाचक रूढी-परंपरांच्या बंधनातून जागे करण्यासाठी, पराक्रमाचे रणशिंग फुंकणा-या आणि गौरवाचे गान गाणाऱ्या ‘तुतारी’ या वाद्याची, निवड न करेल तरच आश्चर्य आहे. इंग्रजी सत्तेच्या आणि संस्कृतीच्या प्रस्थापनेमुळे एक द्विधृवात्मक वैचारिक घुसळण भारतीय संस्कृतीत झाली. या संघर्षाने अहंगंडाच्या आणि न्यूनगंडाच्या टोकांवर माणसांना उभे केले. अशा काळात
मूर्ती फोडोनीया देऊ जोडोनीया
परि विकुनीया टाकू न त्या ( मूर्तिभंजन, केशवसुत)
हा दिलासा देणारे केशवसुत, त्या काळाची गरज होती, असं म्हणलं तर
वावगं ठरू नये. ‘सत्त्वाचा उदयोस्तु करा’ ही त्यांची समाजाला हाक होती. ‘स्वत:ला
कालसुसंगत ठेवत प्रगती साधा’, हे त्यांचे सांगणे होते. समाजाला हे पटवून
देण्यासाठी स्व-प्राणाने ‘तुतारी’ फुंकण्याची, म्हणजेच समाजाच्या कल्याणकारी
परिवर्तनासाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्यांची तयारी होती.
मराठी भाषेत ‘तुतारी’ या
कवितेनं एक नवा साहित्य संप्रदाय सुरु केला. ‘प्रगतीची
एक आर्ष ऋचा’ अशा शब्दात श्री. माधवराव पटवर्धन यांनी या
काव्याचा गौरव केलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आपल्या राष्ट्रात जी प्रचंड
सर्वांगीण क्रांती झाली होती, त्या क्रांतीची ‘वाङ्मयीन मूर्ती’
म्हणजे केशवसुतांची ‘तुतारी’ ही कविता होय. या कवितेचा आत्मा क्रांती हा आहे.
केशवसुतांच्या सामाजिक विचारांची या ठिकाणी अत्यंत प्रभावी आणि उत्स्फूर्त अशी
अभिव्यक्ती झालेली आहे. लक्षावधी लोकांच्या अंतःकरणातील मूक शब्दांना केशवसुतांनी
आपल्या काव्यात वाचा फोडली. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही, बुद्धिवाद या
तत्त्वांवर आधारलेल्या मूल्यांचा त्यांनी निष्ठेने स्वीकार केला. या निष्ठेमधून
त्यांच्या ठिकाणी नव्या जीवनाची जाणीव निर्माण झाली. या जाणिवेने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला
वेगळा आकार दिला. त्यांचे ‘समकालीनांहून वेगळे असणारे व्यक्तिमत्त्व’ आणि ‘अभंग
अशी काव्यनिष्ठा’ हे केशवसुतांच्या
कवितेच्या यशाचं मूळ कारण आहे. आपल्या
व्यक्तिमत्त्वातील पृथकता केशवसुतांना प्रखरपणे जाणवली होती. ‘नव्या दमाचा शूर शिपाई
आहे’, असं केशवसुतांनी स्वतःसंबंधी जे म्हणलं ते केवळ सामाजिकतेच्या संदर्भातच खरं
होतं असं नाही तर त्यांच्या युगसापेक्ष व्यक्तित्वाच्या बाबतीतही खरं होतं.
या कवितेसंबंधी प्रथम जर
कोणता विशेष लक्षात येत असेल तर तिची विशिष्ट चाल. केशवसुतांना नवा विचार
सांगावयाचा होता व तो सांगण्यासाठी त्यांनी जुने संस्कृत वृत्त न निवडता नव्या
प्रभावी विचारांना अधिक सोयीची अशी पादाकुलक जाती वापरलेली आहे. केशवसुतांच्या
विचारातील ओजो गुणास व प्रक्षोभ रसास अनुरूप असं हे गतिमान चालीचे वृत्त आहे. येथे पहिल्या आणि पाचव्या चरणांचा
काव्यखंड तयार केलेला आहे, या रचनेतही केशवसुतांचं नावीन्य दिसून येतं.
पाश्चिमात्त्य
संस्कृतीच्या संपर्काने जी प्रचंड उलथापालथ भारतीय समाजात झालेली होती तिचे पडसाद
केशवसुतांच्या अंत:करणात अगदी खोलवर उमटलेले होते. नव्या जीवनमूल्यांच्या जाणिवेतूनच
त्यांच्या क्रांतिकारक काव्याचा जन्म झाला. केशवसुतांच्या
कवितेमध्ये ‘मूर्तिभंजन’ आणि ‘नव्या मूल्यांची प्रस्थापना’ या दोन्ही अंगांचा आविष्कार
स्पष्ट झालेला दिसतो. सर्व जीर्ण, अन्यायी, मृतप्राय जीवनमूल्यांविरुद्ध त्यांनी
बंड पुकारले. जुनी जीवनमूल्ये उध्वस्त करून नव्या मूल्यांची
प्रस्थापना करण्याची तळमळ त्यांना लागली होती. जातिबंधने, धर्म बंधने, राष्ट्र
बंधने उल्लंघून मानव तेवढा एक होय या भावनेने
त्यांचे विशाल अंत:करण भरून आले होते. या नव्या दमाच्या शिपायाला शांतीचं, प्रेमाचं, मानवतेचं साम्राज्य जगावर स्थापन करावयाचं आहे.
यासाठी जुन्या जगाविरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले आहे आणि सत् - असत् यांचा जो झगडा चालू आहे, त्यामध्ये त्यांनी ‘सत्’
चा म्हणजे सत्याचा पक्ष स्वीकारला आहे. ‘सत्’
आणि ‘असत्’ या संकल्पना ते ‘देव’ आणि ‘दानव’
या प्रतीकांच्या माध्यमातून मांडतात. अन्याय, विषमता, जुलमी रूढी यांचे धर्माच्या
नावे समर्थन करणारे सनातन धर्मीय व समतेचे युग निर्माण करणारे नवयुग प्रवर्तक
यांचा संघर्ष चालू आहे, यालाच कवी देव-दानवांचा संघर्ष म्हणतात.
समाजातील दैन्य दास्य
पाहून कवीच्या मनात विलक्षण चीड निर्माण झालेली आहे. त्यांचं मन विदीर्ण झालं आहे.
त्याबरोबरच या दैन्याचं निर्मूलन व्हावयास हवे, ते लोकांनी आपण होऊन करावयास हवं
ही पण जाणीव निर्माण झाली आणि अशा या दोन्ही जाणिवेतून प्रक्षोभ रस निर्माण झालेला
आहे. यामध्ये वीर, करूण या दोन्ही भावांचा समावेश होत असला तरी त्याचा आविष्कार या
दोन्हींच्या पलीकडचा असा आहे.
स्वातंत्र्य, समता या नव्या मूल्यांचा पुरस्कार करण्यापूर्वी मृतप्राय अशा आपल्या
जीवनमूल्यांना अग्नी दिला पाहिजे या जाणिवेने ‘जुने जाऊद्या..’ यासारखे प्रक्षोभक
उद्गार त्यांच्या मुखातून आलेले आहेत. निष्क्रिय अवस्था, प्रतिगामी मनोवृत्ती
यांची कवीला अत्यंत चीड आलेली होती. अवकाशाच्या ओसाडीतले मुके पडसाद वाचाळ करताना वीणा,
बीन, अलगुज, सतार, सारंगी यासारखी मनोविनोदन करणारी वाद्ये, काय कामाची? अशी प्रस्तावना
करून तुतारीच आपण का निवडली, याची कारणमीमांसा कवी करतात. कवीचा
साध्य-साधन विवेक इथे स्पष्ट होतो.
आपल्या समाजाच्या रूढीग्रस्त अवस्थेचे कवीने वर्णन केलेले आहे. आपल्या समाजामध्ये सत् तत्त्वांची किरणे असत् तत्त्वांच्या ढगांमध्ये लोप पावली आहेत. आपला समाज पुराणप्रिय बनला आहे, ‘अलिकडले ते सगळे खोटे’ असे त्यास वाटू लागले आहे. आपल्या बांधवांना अस्पृश्य कल्पून मानवानेच मानवाला हीन केले आहे. प्रत्येक काळानुसार समाजाने बदलणे अत्यावश्यक आहे, याचे एक प्रखर भान केशवसुतांच्या व्यक्तित्वात दिसून येते. जुन्या काळानुरूप पूर्वजांना जे कळले ते त्यांनी व्यक्त केले. त्यांचा निरोप घेऊन आपण आपल्या पुढच्या मार्गाला लागले पाहिजे. त्यांचा निरोप घ्यायचा याचा अर्थ त्यांच्या संचितातील जे सुयोग्य, कालानुरूप आहे ते घेऊन, त्या आधारे आपल्या कर्तृत्वाने नवीन रोप लावून पुढे गेले पाहिजे. निरोप घेण्याचा अर्थ सोडून देणे किंवा दुर्लक्ष करणे होत नाही.
आपल्या संघशक्तीला, समाजाच्या एकीकरणाला अनेकविध भेदांची पडलेली खिंडारे बुजवण्यासाठी त्यात बेलाशक उड्या घेतल्या पाहिजेत. अज्ञानातून, गैरसमजुतीतून, समाजाच्या अधोगतीला कारणीभूत ठरणा-या ज्या चुकीच्या गोष्टी किंवा पापे घडलेली आहेत त्या पापांचे क्षालन करण्यासाठी तरुणांनी आपलं रक्त अर्पण केलं पाहिजे, म्हणजेच सर्वस्व पणाला लावले पाहिजे, असं ते म्हणतात. केशवसुतांचा काळ पाहिला की आपल्याला लक्षात येते, तिथे फार मोठे मन्वंतर घडत होते. भारतीय आणि इंग्रजी संस्कृतींच्या रूपाने दोन निराळ्या मूल्यधारणा, भिन्न जीवन दृष्टिकोण, विभिन्न जीवन पद्धती असलेल्या संस्कृती आमने – सामने उभ्या होत्या. शासक आणि शासित यांच्या या नात्यामध्ये संघर्ष अपरिहार्य होता, तो केवळ परकीयांशी नव्हता तर संपूर्ण जीवनाला व्यापून राहणारा होता. म्हणून समाजाच्या भल्यासाठी, प्रगतीसाठी विशेष अशा प्रकारची सजगता आणि योगदान कवी अपेक्षित करतात.
पूर्वीपासून
सूर आणि असुर, सत् आणि असत् यांचे युद्ध चालू असून सांप्रत दानव फार माजत आले आहेत
म्हणून कवी देवांच्या मदतीस चला तर असे तरुणांना आवाहन करत आहे. देव व दानव
अर्थातच प्रतीके आहेत. तीव्र अनुभूतीतून येणारी भावनांची उत्कटता, चिंतनशीलता,
सत्याची प्रखर जाणीव आणि वैचारिक परिपक्वता हे या काव्याचे विशेष होत.
‘तुतारी’ या काव्यामध्ये जुन्या कालबाह्य झालेल्या गोष्टींचा तिरस्कार, चीड नव्याच्या पुरस्कारामागील आतुरता, अभिनिवेश, उदात्तता इत्यादी विविध मनोभावनांचे सुंदर रसायन साधले आहे. कडव्या मागुनी कडवी जात आहेत, त्यांच्या धावत्या गतीबरोबर मनही गतिमान होऊन एका नव्या वातावरणामध्ये तरंगू लागते. रम्य अशा कल्पना यामध्ये आहेत. वृत्ताची गतिमानता, खटकेबाज वाक्यप्रयोग, रम्य कल्पना, विविध विकारांचा उन्मेश आणि विचारांची उदात्तता इत्यादी काव्य गुणांनी युक्त अशी ही कविता आहे.
संदर्भ ग्रंथ
१.
मराठी काव्याचे मानदंड – खंड पाहिला – डॉ. स. रा. गाडगीळ
२.
अर्वाचीन मराठी काव्यदर्शन – डॉ. अक्षयकुमार काळे
३. समग्र केशवसुत - संपादक प्रा. भ. श्री. पंडित
प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी
मराठी विभाग, स.भु.कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.
मातृभूमीचा आणि मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे.


No comments:
Post a Comment