..अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली!
श्री. सुरेश
भट
'उषःकाल
होता होता काळरात्र झाली'
ही सुरेश भट यांची अत्यंत गाजलेली
कविता आहे. ‘सिंहासन’ या चित्रपट गीतातून ती रसिकांच्या
काना-मनापर्यंत पोहोचली. सामान्य माणसाचा आवाज झाली. परवा आवर्जून 'सिंहासन' चित्रपट
पाहिला. त्यामुळे ही कविता पुन्हा एकदा मनात जागली. अरुण साधूंच्या विवेचक राजकीय
कादंबऱ्यांतील आशयाला निळू फुले, श्रीराम
लागू आदी दिग्गजांच्या अभिनयाने अगदी जिवंत केलेले आहे. सामान्य माणसाला
भोवळ आणणारा राजकीय पट, त्याच्या आकलन क्षमतेच्या पलीकडे
असणाऱ्या राजकीय हालचाली,
आणि या सा-यांपुढे त्याची व्यक्त
होणारी हतबलता 'उषःकाल होता होता' या गीतातून मोठ्या प्रमाणावर व्यक्त होते.
सृष्टीला ऊर्जा देणारा सूर्य अंधाराच्या पखाली वाहतो तेव्हा सामान्य
माणसाने चार किरणांचीही आस का धरावी, हा
प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. स्वातंत्र्यानंतर आम्ही नवी स्वप्ने पाहिली.
स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची आस नव्या स्वप्नांनी दाखवली गेली. पण स्वप्न
स्वप्नच राहिले. नव्या कट्यारींनी जुने वार व्हावेत तसे नवे राज्यकर्ते
येनकेनप्रकारेण सामान्य माणसाच्या जीवावर उठू लागले. त्यातही त्यांच्या राजकीय
हिताला धक्का बसत असेल तर मग पाहायची सोयच नाही. तेव्हा राजा हा रक्षक नाही तर
भक्षक होतो. दंश करणारा विषारी साप होतो. ही कवीची अत्यंत जहाल आणि कडवट भूमिका
कवितेतून व्यक्त होते.
अशा स्थितीत सुख-समृद्धी हा सामान्य माणसांचा हक्क राहत नाही. भुके-नंगेपण
त्याच्या वाट्याला येतं. कृश, हडकुळे, कुपोषित जीवनदर्शन हेच दाखवते. जनकल्याणार्थ वापरली जावी अशी राष्ट्राची
सुख-समृद्धी सरकारी तिजोरीत बंद झाली, केवळ काहींच्याच तुंबड्या भरणारी ठरली तर
प्रेतही वाली न राहिलेल्या स्मशानाची कळा सामान्य माणसाच्या आयुष्याला येते.
लोकशाहीशी नाते सांगणारा सबंध देश बंदिशाळा होतो. 'जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला' या सारखी कवीची अभिव्यक्ती मातीशी आणि मातेशी
होणारी बेइमानी अत्यंत कठोरपणाने व्यक्त करते. ‘पुण्य दुर्देवी अन् पाप भाग्यशाली’ ठरणाऱ्या या परिस्थितीचा, संस्कृतीला काळिमा फासणाऱ्या या वृत्तींचा
समाचार आम्हीच घेतला पाहिजे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी माणसांनी स्वत्व
सोडून चालणार नाही. आत्मा विकून चालणार नाही. तात्पुरत्या फायद्यासाठी आपल्याला
माणसांच्या मूल्यांचा बाजार मांडता येणार नाही.
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी?
अशा
शब्दात खडा सवाल करणारी, सुरेश भटांची ही कविता आपल्याला
निश्चितच जागवणारी आहे. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या
चितांचे निखारे अजून इथे धुमसत आहेत. वधस्तंभ अजून रक्त मागत आहेत. नवं इप्सित
साधायचं असेल तर स्वराज्य,
स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतु:सूत्रीचा नव्यानं अवलंब करावा
लागेल. या मातीशी आणि या मातेशी इमान राखताना इथली निर्मिती, इथली पीकं, इथल्या
वस्तू, इथली भाषा, इथल्या मातीतून येणारे विचार, इथल्या समजुती, इथल्या श्रद्धा आम्हाला पारखून घ्याव्या लागतील आणि आमच्याच संदर्भात
नव्यानं मांडाव्या लागतील,
नव्यानं स्वीकाराव्या लागतील.
आमच्या राष्ट्राला आत्मभान देणा-या भारताच्या आध्यात्मिक स्वभावाची
ओळख आमच्या शिक्षणातून भावी पिढीला होईल अशा शिक्षणाची संरचना करणं, हे आमचं आद्यकर्तव्य आहे. ‘आध्यात्मिकता’ याचा
अर्थ लोकरूढ असलेल्या धर्मामध्ये सापडणार नाही. मुळातच भारतीय संस्कृतीची धर्माची
संकल्पना अत्यंत व्यापक आणि विश्वव्यापी सृष्टीनियमांशी सांगड घालणारी आहे, याचं भान आपण बाळगलं पाहिजे. या धर्मशिक्षणाने आमच्यातील
व्यापक विचारक्षमता, विशाल दृष्टिकोण, सह्दयता, उदारता, सर्वसामावेशकता वर्तनात आणण्याची क्षमता निर्माण केली
पाहिजे.
जे आम्हाला पटणार नाही, जी
नीती चालणार नाही त्याच्यावर आम्हाला बहिष्कार घालता आलाच पाहिजे. तरच इथली राजकीय
परिस्थिती बदलू शकते. केवळ सत्ताच सर्व काही साधू शकते अशातला भाग नाही. सर्वसामान्य
जनतेचे बळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या पराक्रमाने व्यक्त झालेले आहे. ‘स्वातंत्र्याचा
अमृतमहोत्सव’ साजरा करत असताना सामान्य माणसाच्या एकजुटीच्या सामर्थ्याचे, बलिदानाचे
भान आपण बाळगले पाहिजे. देशाला आकार 'नेता' देत नसतो तर जनता ज्याच्या पाठीमागे उभी राहील तोच नेता, 'पुढे नेणारा' होऊ शकतो आणि म्हणून आपण कोणाच्या, कोणत्या वृत्तींच्या, कोणत्या प्रवृत्तींच्या पाठीमागे उभे राहायचं
हे आम्हाला ठरवता आलं पाहिजे.
कोरोनाची जी भयावह परिस्थिती आम्ही अनुभवलेली आहे त्या परिस्थितीनंतर
खरं म्हणजे आताची परिस्थिती -
'काळरात्र होता होता उष:काल झाला
पुन्हा एकदा जागवा रे राष्ट्र - भवितव्याला'
अशा
प्रकारची आहे. परंतु वसाहतीकरणाची आमची मानसिकता अजूनही संपायला तयार नाही. इंग्रज
गेले परंतु इंग्रजी राज्याने दिलेली गुलामीची मानसिकता आजही आम्हाला ठायी ठायी
दिसून येते. खर्या अर्थाने स्वातंत्र्य उपभोगायचं असेल तर आपला ‘आतला आवाज’
ऐकायला आपण शिकलं पाहिजे. त्या आतल्या आवाजाशी एकनिष्ठ राहायला शिकलं पाहिजे.
सुदैवानं या नव्या वर्षात स्वामी विवेकानंदांच्या जयंतीदिनी ‘श्रीअरविंद जागर’
करण्याचा राष्ट्रनिर्णय झालेला आहे. स्वामी विवेकानंद, श्रीअरविंद यांनी मानवतेला कवेत घेणारे आणि प्रगत करणारे राष्ट्रभान जोपासलेले
आहे. या राष्ट्रभानाची जोपासना करणं, संवर्धन करणं हे
सामान्य नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे.
इंग्रजी शिक्षणाच्या
प्रभावाखाली, इंग्रजी पद्धतीने आयुष्याचा नकारात्मक विचार करण्याची जी सवय आम्हाला
लागलेली आहे, ती आमची सवय 'भारत विविधतेने नटलेला आहे' या वाक्याला, या विचाराला विद्रूप करत 'भारत
विविधतेने फाटलेला आहे' अशा प्रकारचा विचार आम्हाला देण्याचा प्रयत्न
करते. आम्ही भारताच्या सकारात्मक पद्धतीने, साधनांची
कमतरता असेल तरीसुद्धा आमच्या मनाच्या शक्तीने आम्हाला सारं काही करता येतं, हा
आत्मविश्वास जागवला पाहिजे. आम्ही आमची दुःख वेशीला टांगणारी माणसं नाहीत,
याचा
अर्थ आम्ही दुःख झाकून ठेवणार नाहीत परंतु दुःखाला सुखात परावर्तित करण्याची
क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्ही ज्या समाजात जगतो त्या समाजाचं रूपांतर करण्याची
क्षमता आमच्यामध्ये आहे. सामान्य माणसाची ही क्षमता व्यक्त होण्याचा काळ आता जवळ
आलेला आहे.
‘वानर - नर – नारायण’ हा मानवी जीवनाचा प्रवास जर आपण पाहिला तर
एकेकाळी कदाचित असंभाव्य वाटलेली मानवी प्रगती वेगाने घडलेली आपण पाहतो. नराचा नारायण होण्याची दिशा स्वामी विवेकानंद
आणि श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानातून अत्यंत स्पष्ट रूपाने व्यक्त झालेली आहे. म्हणून
भारतीय विचारसरणीशी एकनिष्ठ राहात आम्ही विचार केलाच पाहिजे,
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल'
त्या
नव्या काळाच्या चिंतनासाठी आणि
चिंता छोड कर चिंतन
चर्चा छोड कर आचरण
या संदेशानुरूप आचरण कारण्यासाठी आपल्या सर्वांना ही भारतमाता, हे विश्व नव्या कालगणनेच्या रुपानं, नव्या वर्षाचा रुपानं आशीर्वचन देत आहे. हे आशीर्वचन स्वीकारण्याची
आमची क्षमता आम्ही व्यक्त केली पाहिजे.
चार पुरुषार्थांमध्ये धर्माचा अग्रक्रम आत्मसत्तेचे सामर्थ्य व्यक्त
करणारा आहे. या आत्मसत्तेच्या सिंहानसनावर बसण्याची संधी प्रत्येकाला आहे.
आयुष्याच्या साधनेने त्यासाठीची आपली पात्रता सिद्ध करावी लागते. जो आत्मसत्तेच्या
सिंहानसनावर बसतो, त्याच्यापुढे सा-या सत्ता नतमस्तक असतात. नव्या उष:काली
आयुष्याची ही साधना करण्यासाठी आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा.
डॉ. वृंदा देशपांडे – जोशी
मराठी विभाग, स.भु.कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.
II मातृभूमीचा आणि
मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाने बाळगलाच पाहिजे. II
