Tuesday, 4 October 2022

मागणं हिंददेवीकडे !

मागणं हिंददेवीकडे !

देवीचे नवरात्र सुरू आहेत. आज नवरात्रातली अष्टमी. अहोरात्र जागरण होणार. देवीपुढे  गोंधळ सादर केला जाणार. प्रत्येकाच्या कुलधर्म – कुलाचारानुसार पूजाविधी होणार. स्वातंत्र्याचा उपभोग घेत आपण आनंदाने सण साजरे करतो आहोत. मात्र या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा कधीच विसर पडू नये. ‘त्वमेव सर्वं मम देव देव’ असे म्हणत स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशसेवा करणाऱ्यांचे, हसत हसत फासावर जणाऱ्यांचे आपण वारसदार आहोत. हा वारसा आपल्याला सांभाळता आला पाहिजे.          

भारतीय स्वातंत्र्याचे आणि या स्वातंत्र्याला परिपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये आपण नुकतेच साजरे केले. त्यापाठोपाठ ऑक्टोबरमध्ये आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी नेहमीच मनाच्या एका कोपऱ्यात तेवत असतात. जयंतिनिमित्ताने त्यांना अभिवादन करताना त्यांच्या अनेक आठवणी मनामध्ये दाटल्या. स्वत: गांधीच्या आणि इतर अनेकांच्या लेखनातून गांधीजी इतके आणि असे भेटत राहतात की वाटावे, आपली आणि त्यांची जवळून ओळख आहे. तो माणूस होताच इतका साधा, सरळ, निर्मळ की पूर्वग्रहाशिवाय थेट त्यानाच भेटले की स्थिर - शांत पाण्यात आयुष्याचे स्पष्ट प्रतिबिंब उमटावे.

गांधीजींच्या जीवनाला अनेक पैलू होते. मला स्वत:ला मात्र त्यांचा कायम आकर्षित करणारा पैलू म्हणजे, ‘त्यांनी सामान्य माणसात सत्याच्या अविचल निष्ठेने लढण्याचे जागवलेले  अफाट सामर्थ्य.’ स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व म. गांधींकडे आल्यानंतर देशव्यापी प्रमाणात वाढलेली चळवळ, घराघरातून सहभागी झालेले स्त्री-पुरुष हे चित्र आठवले म्हणजे वाटायला लागते. ‘...जणू काही तो काळच असा होता की संपूर्ण समाज सत्याची कास धरून निर्मोहाच्या वाटेवर आत्मबळाने पावले टाकत होता.’ हे चित्र डोळ्यांसमोर रेंगाळत राहिले आणि त्यापाठीमागे आपोआप आठवली कवी यशवंत यांची कविता, ‘तुरुंगाच्या दारात’.

आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. ‘रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत यशवंत यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव होय. जाणून घेऊयात ‘तुरुंगाच्या दारातून’ हे कवी यशवंत यांचे काव्य -

 

वाढू दे कारागृहाच्या भिंतिची उंची किती

               मन्माना नाही क्षिती

भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोण्डुनी

                 मुक्त तो रात्रंदिनी

निर्भय आणि निर्मोही होऊन अन्यायाविरुद्ध लढणारा सामान्य माणूस पाहिला की आपण आश्चर्याने थक्क होतो. हे बळ कुठून येते याचा विचार करताना साहजिकच तत्वज्ञ अॅरिस्टॉटल आठवतात, ते लिहितात -

 माणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हाच त्याच्या साक्षात्काराचा क्षण असतो. तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणिवांमधून प्रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यादपण लक्षात येते”

या आत्मबळाची जाणीव होऊन कोणा एकाने जागे होणे निराळे आणि सबंध समाजाला जागवणे निराळे. गांधीजींचे वेगळेपण आहे ते इथे. संयमाच्या आणि सत्याच्या मार्गाने, अहिंसेच्या वाटेने संपूर्ण समाजाला चालायला लावणे; हिंसेचे वळण लागताच चळवळ स्थगित करणे म्हणजे चेष्टा नाही. त्यामुळेच,

गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधीकाळी उमटवून गेला हे पुढल्या काळाला खरे देखील वाटणार नाही” हे आईन्स्टाईन यांचे विधान खरे वाटायला लागते.

गांधींचे व त्यांच्या चळवळीचे महत्त्व गिल्बर्ट मुरे यांनी हिब्बर्ट जर्नल (1914) च्या अंकात पुढीलप्रमाणे व्यक्त करून ठेवले आहे,

"सत्तेत असणाऱ्या माणसांनी या माणसाशी वागताना फार काळजी घेतली पाहिजे. हा माणूस फार निराळा आहे. त्याला इंद्रियगम्य सुखांची तमा नाही. त्याला श्रीमंती नकोच आहे. ऐषआराम, प्रशंसा आणि सोयी - सवलती त्याच्या जवळपास फटकू शकत नाहीत. त्याला जी गोष्ट बरोबर वाटते ती करण्याचा त्याचा एकमेव ठाम निर्धार असतो. तो फार धोकादायक व अस्वस्थ करून सोडणारा शत्रू आहे. कारण त्याच्या शरीरावर तुम्हाला नेहमीच विजय मिळविता येतो परंतु त्याचा आत्मा तुम्हाला अंशमात्रानेही विकत घेता येत नाही."

कवी यशवंत यांच्या आत्मयाबाबतच्या ‘मुक्त तो रात्रंदिनी’ या उल्लेखाचे प्रतिबिंब गांधीजीनी उभारलेल्या चळवळीत दिसायला लागते. लाठ्या-काठ्या मानवी शरीराना जखमी करत होत्या, तुरुंग छळत होते, बंदुकीच्या गोळ्या चिंधड्या उडवत होत्या पण सामान्य माणसाच्या उरातला आवेश अभंग होता. मनामध्ये जागलेली देशभक्तीची ज्योत कोणत्याच वादळांना जुमानणारी नव्हती. ‘ब्रिटिश इंडिया’ आणि ‘संस्थानी भारत’ या दोन्ही ठिकाणच्या लढयामध्ये या जनशक्तीचे प्रत्यंतर येत होते.

 हैद्राबाद मुक्तिसंग्रामामध्ये गांधीजींच्या प्रेरणेसारखीच प्रेरणा कार्यरत होती, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून. त्या संन्यस्त, निर्मोही माणसाचे जीवन लढ्याला धर्मनिरपेक्षतेचे रूप देऊन गेले. परिस्थितीविरुद्ध ‘ब्र’ ही उच्चारण्याची हिंमत नसलेला सामान्य माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. सामान्य माणसाच्या अस्मितेवरचा घाला त्याच्या अस्तित्वाला आव्हान देणारा ठरला. संस्कृतीचे संचित अशा अटितटीच्या क्षणी सामान्य माणसाचे आत्मबळ जागवत असते. पराक्रमाचा, शौर्याचा, औदार्याचा कोणता वारसा घेऊन तो जन्माला आलेला आहे, याची आठवण देदीप्यमान इतिहास करून देत असतो. आवश्यकता असते ती मुळांशी – मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची. गांधीजींनी एके ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे, ‘मूल्यांशी तडजोड होऊ शकत नाही. तडजोडी या देवाणघेवाणीवर आधारलेल्या असतात पण मूलभूत तत्त्वांची अशी देवाणघेवाण करताच येत नाही. त्याबाबत केलेली तडजोड म्हणजे फक्त शरण जाणे असते. त्यात फक्त द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नसतं.’

अध्यात्मिकता हा स्वभाव असलेल्या भारतातील सामान्य माणूस मूल्यजोपासनेचा प्रामाणिक प्रयत्न करतो. बाराव्या शतकापासून परकीयांच्या सवाऱ्यांची सवय जडलेला इथला माणूस प्रसंगी थकला, निराश झाला. मात्र नेस्तनाबूत कधीच झाला नाही.

घालिती सैतानसे शत्रू इथे थैमान जे

              ते गिळाया मी सजे 

ही त्याची निरंतर प्रेरणा आहे. हर तऱ्हेचा संघर्ष वाट्याला आलेल्या या माणसाला काटे-कुटे, अडीअडचणी या नेहमीच्या आहेत. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीचेही तो स्वागतच करतो. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या वीरांचे मनोगत कवी यशवंत मोठ्या सुरेख पद्धतीने व्यक्त करतात. ते लिहितात –

अग्निकुंडी पाय केंव्हा, कंटकीही केधवा

                बंदिखान्याची  हवा

या विलासामाजी होई आमुची जोपासना

                तेज नाही याविना 

हा स्वातंत्र्यवीर मातृभूमीला, हिंददेवीला उद्देशून म्हणतो, ‘मी तुझा गोंधळी, तुझा भक्त संबळ वाजवत, तुझ्या स्वातंत्रयाचे गान गात दऱ्याखोऱ्यातून हिंडत आहे. मी निर्भयपणाने तुझ्या मंदिरात विश्रांतीला आलेलो आहे. तुझा कृपासिंधू माझ्या मस्तकी असल्यामुळे दु:ख-कष्टाची मला तमा वाटत नाही. मातृभूमीच्या वरदहस्तामुळे अग्नी देखील चदनाचा लेप, अमृताचे सिंचन वाटते. मी चालताना माझ्या पायातल्या ज्या बेड्या वाजतात त्या मला तुझ्या मंत्रघोषासारख्या वाटतात. लवकरच स्वातंत्र्याचा सूर्य भारतामध्ये उगवू दे तेंव्हाच आम्ही पावन होऊ.

(संबळ हे एक लोकवाद्य आहे. संबळ वाजवणाऱ्याला गाता आले पाहिजे. हे वाद्य स्वत: गात गतीत वाजवावे लागते. संबळ वाद्य एकाच वेळी शांत व उग्र आहे. ते कोमल आणि तीव्र देखील आहे. तसेच ते ऐक्य व विग्रह करणारे आहे, असेही समजतात.)

. ‘तुरुंगाच्या दारातून’ हिंददेवीकडे जे मागणे मागीतले गेले ते कवी यशवंत यांच्या काव्यातून आपल्यासमोर उभे राहीले आहे. स्वातंत्र्याच्या दारातून आज हा वारसा पुढे चालवताना स्वातंत्र्याचा सूर्य मावळू न देण्याची जबाबदारी आपोआपच आपल्यावर येते. त्यासाठी आज अचाट पराक्रमाची आवश्यकता नाही, तर गरज आहे, स्वत:शी प्रामाणिक राहून प्रत्येक आघाडीवरचे स्वत:चे कर्तव्य पूर्ण करण्याची. सभोवतालचे भान ठेवून स्वातंत्रयासोबत आलेल्या ‘समता’ आणि ‘बंधुता’ खऱ्या अर्थाने जोपासण्याची. आत्मभान येऊन आत्मबळाने ते जोपासता आले पाहिजे. माझ्यातला मी विकसित होत आम्हीमध्ये विलीन झाला पाहिजे. कृती हीच भाषा असलेल्या राष्ट्रपिता म. गांधींजीचे आम्ही वारसदार, कृतीसाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहणार आहोत ?

1989 साली लिहिलेल्या 'कावड' या सदरातील 'गांधी आमचा कोण लागतो?' या लेखात कुसुमाग्रजांच्या काव्याचा संदर्भ देत अनंत भालेराव लिहितात,

 ''गांधींच्या बद्दल म्हणता येईल विश्वव्यापी मानवतेने आपला स्वतःचा सारांश करायचे ठरवले आणि गांधींच्या रूपात तो सारांश व्यक्त झाला. या सारांशाने अनेक अहंकारी विस्तार वस्त्रगाळ करून शून्यावर नेले तर असंख्य सामान्यांच्या जीवनाचे सारांश आकाशाला व्यापून उरले."

राष्ट्रपिता आणि भूमाता आकाशव्यापी होण्यासाठी आपल्याला बोलावत आहेत.

 

संदर्भ

१. संपादक कुलकर्णी गो.म. , कुलकर्णी व. दि. , मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड सहा - भाग दोन, इ. स. 1920 ते 1950, महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे.

२. भालेराव अनंत, 'गांधी आमचा कोण लागतो' कावडऋतू प्रकाशन मुंबई.

३. भालेराव अनंत, खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी, कावडऋतू प्रकाशन मुंबई

४. द्वादशीवार सुरेश, 'गांधीजी आणि त्यांचे गूढ', मीडिया वॉच गांधी 150 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती विशेषांक, मिडीया वॉच पब्लिकेशन, गिरगाव,मुंबई   

५. द्वादशीवार सुरेश,'गांधी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षणमीडिया वॉच गांधी 150 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती विशेषांक, मिडीया वॉच पब्लिकेशन, गिरगाव,मुंबई

 

प्रा. वृंदा देशपांडे – जोशी

मराठी विभाग,

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय.

 

 

 मातृभूमीचा व मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाला वाटलाच पाहिजे.  



मागणं हिंददेवीकडे !

  मागणं हिंददेवीकडे ! देवीचे नवरात्र सुरू आहेत. आज नवरात्रातली अष्टमी. अहोरात्र जागरण होणार. देवीपुढे  गोंधळ सादर केला जाणार. प्रत्येकाच...