Tuesday, 4 October 2022

मागणं हिंददेवीकडे !

मागणं हिंददेवीकडे !

देवीचे नवरात्र सुरू आहेत. आज नवरात्रातली अष्टमी. अहोरात्र जागरण होणार. देवीपुढे  गोंधळ सादर केला जाणार. प्रत्येकाच्या कुलधर्म – कुलाचारानुसार पूजाविधी होणार. स्वातंत्र्याचा उपभोग घेत आपण आनंदाने सण साजरे करतो आहोत. मात्र या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचा कधीच विसर पडू नये. ‘त्वमेव सर्वं मम देव देव’ असे म्हणत स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवून देशसेवा करणाऱ्यांचे, हसत हसत फासावर जणाऱ्यांचे आपण वारसदार आहोत. हा वारसा आपल्याला सांभाळता आला पाहिजे.          

भारतीय स्वातंत्र्याचे आणि या स्वातंत्र्याला परिपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये आपण नुकतेच साजरे केले. त्यापाठोपाठ ऑक्टोबरमध्ये आली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी नेहमीच मनाच्या एका कोपऱ्यात तेवत असतात. जयंतिनिमित्ताने त्यांना अभिवादन करताना त्यांच्या अनेक आठवणी मनामध्ये दाटल्या. स्वत: गांधीच्या आणि इतर अनेकांच्या लेखनातून गांधीजी इतके आणि असे भेटत राहतात की वाटावे, आपली आणि त्यांची जवळून ओळख आहे. तो माणूस होताच इतका साधा, सरळ, निर्मळ की पूर्वग्रहाशिवाय थेट त्यानाच भेटले की स्थिर - शांत पाण्यात आयुष्याचे स्पष्ट प्रतिबिंब उमटावे.

गांधीजींच्या जीवनाला अनेक पैलू होते. मला स्वत:ला मात्र त्यांचा कायम आकर्षित करणारा पैलू म्हणजे, ‘त्यांनी सामान्य माणसात सत्याच्या अविचल निष्ठेने लढण्याचे जागवलेले  अफाट सामर्थ्य.’ स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व म. गांधींकडे आल्यानंतर देशव्यापी प्रमाणात वाढलेली चळवळ, घराघरातून सहभागी झालेले स्त्री-पुरुष हे चित्र आठवले म्हणजे वाटायला लागते. ‘...जणू काही तो काळच असा होता की संपूर्ण समाज सत्याची कास धरून निर्मोहाच्या वाटेवर आत्मबळाने पावले टाकत होता.’ हे चित्र डोळ्यांसमोर रेंगाळत राहिले आणि त्यापाठीमागे आपोआप आठवली कवी यशवंत यांची कविता, ‘तुरुंगाच्या दारात’.

आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. यशवंत दिनकर पेंढरकर ऊर्फ कवी यशवंत हे मराठी कवी होते. 'महाराष्ट्रकवी' म्हणून त्यांना गौरवाने उल्लेखले जाते. ते बडोदा संस्थानाचे राजकवी होते. ‘रविकिरण मंडळातील' सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत यशवंत यांच्या नावाचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. उत्कट आत्मपरता हा यशवंतांच्या प्रतिभेचा स्थायीभाव होय. जाणून घेऊयात ‘तुरुंगाच्या दारातून’ हे कवी यशवंत यांचे काव्य -

 

वाढू दे कारागृहाच्या भिंतिची उंची किती

               मन्माना नाही क्षिती

भिंतीच्या उंचीत आत्मा राहतो का कोण्डुनी

                 मुक्त तो रात्रंदिनी

निर्भय आणि निर्मोही होऊन अन्यायाविरुद्ध लढणारा सामान्य माणूस पाहिला की आपण आश्चर्याने थक्क होतो. हे बळ कुठून येते याचा विचार करताना साहजिकच तत्वज्ञ अॅरिस्टॉटल आठवतात, ते लिहितात -

 माणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हाच त्याच्या साक्षात्काराचा क्षण असतो. तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणिवांमधून प्रगट जाणिवेत नेणारा असतो. त्यातून त्याला आत्मबळ गवसते आणि आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचे अमर्यादपण लक्षात येते”

या आत्मबळाची जाणीव होऊन कोणा एकाने जागे होणे निराळे आणि सबंध समाजाला जागवणे निराळे. गांधीजींचे वेगळेपण आहे ते इथे. संयमाच्या आणि सत्याच्या मार्गाने, अहिंसेच्या वाटेने संपूर्ण समाजाला चालायला लावणे; हिंसेचे वळण लागताच चळवळ स्थगित करणे म्हणजे चेष्टा नाही. त्यामुळेच,

गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधीकाळी उमटवून गेला हे पुढल्या काळाला खरे देखील वाटणार नाही” हे आईन्स्टाईन यांचे विधान खरे वाटायला लागते.

गांधींचे व त्यांच्या चळवळीचे महत्त्व गिल्बर्ट मुरे यांनी हिब्बर्ट जर्नल (1914) च्या अंकात पुढीलप्रमाणे व्यक्त करून ठेवले आहे,

"सत्तेत असणाऱ्या माणसांनी या माणसाशी वागताना फार काळजी घेतली पाहिजे. हा माणूस फार निराळा आहे. त्याला इंद्रियगम्य सुखांची तमा नाही. त्याला श्रीमंती नकोच आहे. ऐषआराम, प्रशंसा आणि सोयी - सवलती त्याच्या जवळपास फटकू शकत नाहीत. त्याला जी गोष्ट बरोबर वाटते ती करण्याचा त्याचा एकमेव ठाम निर्धार असतो. तो फार धोकादायक व अस्वस्थ करून सोडणारा शत्रू आहे. कारण त्याच्या शरीरावर तुम्हाला नेहमीच विजय मिळविता येतो परंतु त्याचा आत्मा तुम्हाला अंशमात्रानेही विकत घेता येत नाही."

कवी यशवंत यांच्या आत्मयाबाबतच्या ‘मुक्त तो रात्रंदिनी’ या उल्लेखाचे प्रतिबिंब गांधीजीनी उभारलेल्या चळवळीत दिसायला लागते. लाठ्या-काठ्या मानवी शरीराना जखमी करत होत्या, तुरुंग छळत होते, बंदुकीच्या गोळ्या चिंधड्या उडवत होत्या पण सामान्य माणसाच्या उरातला आवेश अभंग होता. मनामध्ये जागलेली देशभक्तीची ज्योत कोणत्याच वादळांना जुमानणारी नव्हती. ‘ब्रिटिश इंडिया’ आणि ‘संस्थानी भारत’ या दोन्ही ठिकाणच्या लढयामध्ये या जनशक्तीचे प्रत्यंतर येत होते.

 हैद्राबाद मुक्तिसंग्रामामध्ये गांधीजींच्या प्रेरणेसारखीच प्रेरणा कार्यरत होती, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून. त्या संन्यस्त, निर्मोही माणसाचे जीवन लढ्याला धर्मनिरपेक्षतेचे रूप देऊन गेले. परिस्थितीविरुद्ध ‘ब्र’ ही उच्चारण्याची हिंमत नसलेला सामान्य माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. सामान्य माणसाच्या अस्मितेवरचा घाला त्याच्या अस्तित्वाला आव्हान देणारा ठरला. संस्कृतीचे संचित अशा अटितटीच्या क्षणी सामान्य माणसाचे आत्मबळ जागवत असते. पराक्रमाचा, शौर्याचा, औदार्याचा कोणता वारसा घेऊन तो जन्माला आलेला आहे, याची आठवण देदीप्यमान इतिहास करून देत असतो. आवश्यकता असते ती मुळांशी – मूल्यांशी प्रामाणिक राहण्याची. गांधीजींनी एके ठिकाणी स्पष्ट सांगितलेले आहे, ‘मूल्यांशी तडजोड होऊ शकत नाही. तडजोडी या देवाणघेवाणीवर आधारलेल्या असतात पण मूलभूत तत्त्वांची अशी देवाणघेवाण करताच येत नाही. त्याबाबत केलेली तडजोड म्हणजे फक्त शरण जाणे असते. त्यात फक्त द्यायचं असतं, घ्यायचं काहीच नसतं.’

अध्यात्मिकता हा स्वभाव असलेल्या भारतातील सामान्य माणूस मूल्यजोपासनेचा प्रामाणिक प्रयत्न करतो. बाराव्या शतकापासून परकीयांच्या सवाऱ्यांची सवय जडलेला इथला माणूस प्रसंगी थकला, निराश झाला. मात्र नेस्तनाबूत कधीच झाला नाही.

घालिती सैतानसे शत्रू इथे थैमान जे

              ते गिळाया मी सजे 

ही त्याची निरंतर प्रेरणा आहे. हर तऱ्हेचा संघर्ष वाट्याला आलेल्या या माणसाला काटे-कुटे, अडीअडचणी या नेहमीच्या आहेत. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीचेही तो स्वागतच करतो. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व समर्पण करणाऱ्या वीरांचे मनोगत कवी यशवंत मोठ्या सुरेख पद्धतीने व्यक्त करतात. ते लिहितात –

अग्निकुंडी पाय केंव्हा, कंटकीही केधवा

                बंदिखान्याची  हवा

या विलासामाजी होई आमुची जोपासना

                तेज नाही याविना 

हा स्वातंत्र्यवीर मातृभूमीला, हिंददेवीला उद्देशून म्हणतो, ‘मी तुझा गोंधळी, तुझा भक्त संबळ वाजवत, तुझ्या स्वातंत्रयाचे गान गात दऱ्याखोऱ्यातून हिंडत आहे. मी निर्भयपणाने तुझ्या मंदिरात विश्रांतीला आलेलो आहे. तुझा कृपासिंधू माझ्या मस्तकी असल्यामुळे दु:ख-कष्टाची मला तमा वाटत नाही. मातृभूमीच्या वरदहस्तामुळे अग्नी देखील चदनाचा लेप, अमृताचे सिंचन वाटते. मी चालताना माझ्या पायातल्या ज्या बेड्या वाजतात त्या मला तुझ्या मंत्रघोषासारख्या वाटतात. लवकरच स्वातंत्र्याचा सूर्य भारतामध्ये उगवू दे तेंव्हाच आम्ही पावन होऊ.

(संबळ हे एक लोकवाद्य आहे. संबळ वाजवणाऱ्याला गाता आले पाहिजे. हे वाद्य स्वत: गात गतीत वाजवावे लागते. संबळ वाद्य एकाच वेळी शांत व उग्र आहे. ते कोमल आणि तीव्र देखील आहे. तसेच ते ऐक्य व विग्रह करणारे आहे, असेही समजतात.)

. ‘तुरुंगाच्या दारातून’ हिंददेवीकडे जे मागणे मागीतले गेले ते कवी यशवंत यांच्या काव्यातून आपल्यासमोर उभे राहीले आहे. स्वातंत्र्याच्या दारातून आज हा वारसा पुढे चालवताना स्वातंत्र्याचा सूर्य मावळू न देण्याची जबाबदारी आपोआपच आपल्यावर येते. त्यासाठी आज अचाट पराक्रमाची आवश्यकता नाही, तर गरज आहे, स्वत:शी प्रामाणिक राहून प्रत्येक आघाडीवरचे स्वत:चे कर्तव्य पूर्ण करण्याची. सभोवतालचे भान ठेवून स्वातंत्रयासोबत आलेल्या ‘समता’ आणि ‘बंधुता’ खऱ्या अर्थाने जोपासण्याची. आत्मभान येऊन आत्मबळाने ते जोपासता आले पाहिजे. माझ्यातला मी विकसित होत आम्हीमध्ये विलीन झाला पाहिजे. कृती हीच भाषा असलेल्या राष्ट्रपिता म. गांधींजीचे आम्ही वारसदार, कृतीसाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहणार आहोत ?

1989 साली लिहिलेल्या 'कावड' या सदरातील 'गांधी आमचा कोण लागतो?' या लेखात कुसुमाग्रजांच्या काव्याचा संदर्भ देत अनंत भालेराव लिहितात,

 ''गांधींच्या बद्दल म्हणता येईल विश्वव्यापी मानवतेने आपला स्वतःचा सारांश करायचे ठरवले आणि गांधींच्या रूपात तो सारांश व्यक्त झाला. या सारांशाने अनेक अहंकारी विस्तार वस्त्रगाळ करून शून्यावर नेले तर असंख्य सामान्यांच्या जीवनाचे सारांश आकाशाला व्यापून उरले."

राष्ट्रपिता आणि भूमाता आकाशव्यापी होण्यासाठी आपल्याला बोलावत आहेत.

 

संदर्भ

१. संपादक कुलकर्णी गो.म. , कुलकर्णी व. दि. , मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड सहा - भाग दोन, इ. स. 1920 ते 1950, महाराष्ट्र साहित्य परिषद , पुणे.

२. भालेराव अनंत, 'गांधी आमचा कोण लागतो' कावडऋतू प्रकाशन मुंबई.

३. भालेराव अनंत, खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी, कावडऋतू प्रकाशन मुंबई

४. द्वादशीवार सुरेश, 'गांधीजी आणि त्यांचे गूढ', मीडिया वॉच गांधी 150 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती विशेषांक, मिडीया वॉच पब्लिकेशन, गिरगाव,मुंबई   

५. द्वादशीवार सुरेश,'गांधी आणि त्यांच्या साक्षात्काराचा क्षणमीडिया वॉच गांधी 150 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती विशेषांक, मिडीया वॉच पब्लिकेशन, गिरगाव,मुंबई

 

प्रा. वृंदा देशपांडे – जोशी

मराठी विभाग,

सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय.

 

 

 मातृभूमीचा व मातृभाषेचा नैतिक धाक प्रत्येकाला वाटलाच पाहिजे.  



Tuesday, 9 August 2022

पंचाहत्तरीची उमर गाठली ...

 




पंचाहत्तरीची उमर गाठली ...

गेल्या वर्षभरापासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा जयघोष आपण करतो आहोत. पाहता पाहता ऑगस्ट महिना आला आणि १५ ऑगस्टही लवकरच येईल. सहजच वाटले, अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आपण आपल्याला काय वाटते यावर वारेमाप बोलतो. जिच्यासाठी जयघोष करतो आहोत त्या भारतमातेला काय वाटत असेल, याचा विचारही नाही केला. साहजिकच भूमातेचा विचार करणारे, मन जाणून घेणारे कितीतरी साहित्य डोळ्यासामोरून झरकन येऊन गेले. कवी कुसुमाग्रजांजवळ मन रेंगाळले. मन थेट २५ वर्षे मागे गेले. आणि आठवली त्यांची अवघी कविता -

पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका

मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका

‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’ या कवितेतून मातृभूमीचे मनोगत कवी कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेले आहे. अनेक सरकारी कार्यालयांमधील आणि शाळांमधील भिंतींनी प्रदीर्घकाळ ही कविता मोठ्या मानाने मिरवली. मला वाटते ही कविता मनामनात झिरपून आचरणातून प्रतिबिंबित होईपर्यंत फक्त वयाचा पहिला आकडा बदलता ठेवला तरी ही कविता काळाशी सातत्याने जवळीकतेचे नाते सांगत राहील. ‘फटका’ या काव्यप्रकारात १९९६ मध्ये रचलेले हे काव्य मातृभूमीचे हृदगत व्यक्त करणारे आहे. सभोवतीची परिस्थिती पाहून मातेचे हृदय हेलावून जाते. जाता – येता वंदन करणाऱ्या भारतीय मनास तीच हात जोडून प्रार्थना करते, स्वत्वाची आठवण जागवते, “सूर्यकूलाचा, तेजाचा वारसा लाभलेल्यांनी प्रकाशाचेच पूजक झाले पाहिजे. अंधाराची पूजा करून कुलधर्माशी प्रतारणा त्यांनी करू नये.” मुळातच भारत प्रकाशात रत असणारा देश आहे. हा प्रकाश ज्ञानाचा, पावित्र्याचा, मांगल्याचा, सौहार्दाचा; तो जोपासला पाहीजे.

‘धर्म’ या संकल्पनेला मध्यवर्ती स्थान देणारी आपली संस्कृती शास्त्रोपासक आहे. चिकित्सक वृत्तीतून, प्रयोगशील प्रवृत्तीतून हाती आलेले अनुभवजन्य ज्ञान लोकभाषेतून, प्रचलित संकल्पनांमधून सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवले गेले. परंपरेच्या संचितातून ते प्रवाहीत होत राहिले. या संचिताच्या मुळाशी जाऊन त्याचा कालानुरूप अर्थ समजावून घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्याच्या अभावी जीवनसंस्कृतीविषयी अज्ञान, भय निर्माण होते. अशा अवस्थेत संस्कृतीचा, देशाचा वृथा अभिमान बाळगणे अधिक घातक ठरते. आंधळेपणाने केलेले रूढी-प्रथा-परंपरांचे पालन समाजाला अधोगतीकडे नेते. बदल, परिवर्तन होणे, जुन्याच्या जागी नवे येणे या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. त्या खुल्या मनाने आपल्याला स्वीकारता आल्या पाहिजेत. भूतकाळाबद्दल गळे काढत बसण्यापेक्षा भविष्याकडे डोळस व आश्वासक वाटचाल केली पाहिजे.   

त्यासाठी आपली कामे, आपल्या जबाबदाऱ्या उत्तमपणे सांभाळता आल्या पाहिजेत, हे सांगताना

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।


इतक्या साध्या सोप्या शब्दात ‘देशद्रोहा’ची आलेली व्याख्या माणसाला अधिक सजग करून जाते. देशद्रोह, दहशतवाद, अन्याय, अत्याचार असे शब्द समोर आले की ‘आपण नाही बाबा त्यातले’, अशी सामान्य माणूस स्वत:ची समजूत करून घेतो. वास्तविक पाहता ‘भ्रष्टाचार हाच शिष्टाचार’ अशी प्रथा जिथे विकसित होते, तिथे आपपत: वरील सर्व दुर्गुण कळत-नकळत मूळ धरायला लागतात. भारतीय संस्कृतीत ‘राजा हा प्रजेचा सेवक’, ‘राजेपद जनसेवेसाठी’ या धारणा प्रमाण मानल्या गेलेल्या आहेत. तिथे

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा।

अशी आठवण भारतमातेला द्यावी लागते, याचा आपण प्रगत समाज म्हणवून घेताना गांभीर्याने विचार केला पाहिजे.

समाजाचे नेतृत्व, प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे, आपल्याला आदर्शवत वाटणाऱ्या माणसांचे प्रेरणादायीत्वाची खूण म्हणून आपण पुतळे उभारतो. पण एकदा पुतळे उभारून झाले की प्रेरणा कधी संपुष्टात येते, आणि केवळ एखाद्या पत्त्याच्या खुणेसाठी त्यांचा वापर केंव्हा व्हायला लागतो, हे आपल्यालाही कळत नाही. तिच्या वीरपुत्रांचे अशा पद्धतीने उभारलेले पुतळे म्हणजे भारतमातेला त्यांची विटंबना वाटते. पुतळ्यांना हार-फुलं वाहून, शब्दबंबाळ भाषणे करून त्यांचे वांझ गोडवे गाण्यापेक्षा कणभर तरी त्यांचा मार्ग अनुसरावा; ज्यामुळे देशाचे आणि मानवतेचे भले होऊ शकेल अशी रास्त आणि स्पष्ट अपेक्षा भारतमाता व्यक्त करते.

त्याही पुढे जाऊन धोक्याची सूचना ती देते, स्वातंत्र्याच्या काळात ज्या सत्तेच्या जोरावर आपण नानाविध निर्णय घेतो ती सत्ता दुधारी आहे. ही सत्ता जनकल्याणासाठी वापरली गेली तर ती अमृतासारखी तारक आहे. मात्र त्या सत्तेची नशा चढली तर ती मदिरेसारखी मादक होण्यास वेळ लागत नाही. आपले कामाचे ठिकाण मंदिरासारखे पवित्र असावे. त्या मंदिराचे मदिरालय होऊ देऊ नका. कर्मयोगाची आठवण आपली मातृभूमी आपल्याला देते, त्या आठवणीशी इमान राखता आले पाहिजे.व्यवस्थेला केवळ नावे ठेवण्यापेक्षा प्रकाश पेरला पाहिजे, दिव्याने दिवा लावला पाहिजे. कुठेही काही चांगले घडताना दिसले की त्यातील उणे-दुणे न काढता शक्य ती मदत करावी. गोर-गरीबांना छळणे, गुणी माणसांवर जळणे, कोणाचे दोष दिसताच त्याची चार-चौघात वाच्यता करत राहणे या बाबी टाळल्या पाहिजेत.

कुसुमाग्रजांचा हा ‘फटका’ व्यावहारिक जीवनात कसे वागावे, हे सांगतानाच आपल्या भाषेप्रती आपली संवेदनशीलता कशी असावी, संस्कृती जोपासण्यासाठीचे आपले भाषिक कर्तव्य काय, हे स्पष्टपणे सांगतो. माणसाने बहुभाषिक व्हावे, पण त्यासाठी मातृभाषेची उपेक्षा करण्याचे कारण नाही. भाषा-विचार-कृती यातून संस्कृती आकाराला येते.

भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे

गुलाम भाषिक होऊन आपल्या प्रगतीचे शिर कापू नका

आजही आमच्या मुलांना कोणत्या भाषेतून शिक्षण द्यावे, या संभ्रमात असणाऱ्या आम्हा लोकांना मातृभूमी, मातृभाषेचे मोल फार चपखलपणाने सांगते. मुळामध्ये स्वतंत्रपणे विचार करण्याची व तो अभिव्यक्त करण्याची क्षमता मातृभाषेतील शिक्षणाने विकसित होते. ज्याची मातृभाषा पक्की तो अन्य भाषा सहजतेने शिकू शकतो. भाषेचा अभ्यास अवांतर वाचनाची ओढ निर्माण करतो. प्रगल्भ वाचनातून संस्कृतीच्या समृद्धतेची दारे साहित्य आपसूक खुले करून देते.

      वाचता वाचता मनुष्य आपसूक लिहिता होतो, लिहिणाऱ्याला कुसुमाग्रजांनी मोठं छान सावध केले आहे. ते म्हणतात हाती लेखणी आली म्हणून वर्षभर शिमग्याचा सण साजरा करू नये. आवश्यक टीका – टिपण्णी जरूर करावी पण त्यातूनही काही विधायक घडावे. विघातक टीकेने विध्वंसापलीकडे फार काही साधता येत नाही. अपप्रवृत्तींचा मात्र तीव्र निषेध करत त्या मुळापासून उखडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. या कठीण वाटेवर धैर्याने चालावे लागते. वाट सुकर व्हावी यासाठी चुकीचे आणि नकारात्मक कार्य करणाऱ्यांशी नाते जोडून चालत नाही तद्वतच समृद्धीकडे पाठ फिरवून बैरागीपण स्वीकारणेही योग्य नव्हे. प्रामाणिक कष्टांनी ही समृद्धी समाधानासह मिळवता आली पाहिजे. आपले समाधान दुसऱ्याला वाटता आले पाहिजे. द्वेष-मत्सरातून इतरांची घरे उद्ध्वस्त करून स्वत:चे घर उभारता येत नाही आणि उभारु नये. आपण सज्जन असावे पण ही सज्जनता दुबळी नसावी. दुर्जनांना योग्य तो धडा शिकवण्याचे बळ आपण अंगी बाळगले पाहिजे. त्यासाठी तरुणाईचे बळही एखाद्या वृक्षाप्रमाणे वाढवावे. जे स्वत:च्या जोमाने वाढू शकेल व कालानुरूप नित्यनूतनता धारण करेल.

      राष्ट्रीय एकात्मतेच्या, समानतेच्या गप्पा मारत प्रत्यक्ष जीवनामध्ये जातिभेद, उच्च-नीचता मानणे अयोग्य आहे. आवश्यकतेनुसार कायदे केलेच पाहिजेत पण जातिभेदाचे हे विष माणसांच्या अंतरंगातून बाहेर पडायला हवे. स्त्री-पुरुष समतेचे गोडवे गाताना तिला माणूस म्हणून वागवणे अत्यावश्यक आहे.

समान मानव माना स्त्री तिची अस्मिता खुडू नका।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका।।

अशा मार्मिक शब्दांमध्ये समाजाची मानसिकता कवी अधोरेखित करतात.

      नास्तिक असावे की आस्तिक हा वैयक्तिक प्रश्न आहे पण कसेही असलात तरी माणुसकीतला देव पाहता, जाणता आणि जोपासता आला पाहिजे.

माणुस म्हणजे पशू नसे। हे ज्याच्या हृदयात ठसे।
नर नारायण तोच असे।


या शेवटच्या कडव्यामध्ये संस्कृतीचा सारांश व्यक्त होताना दिसतो. आध्यात्मिकता हा भारताचा स्वभाव. वानर – नर - नारायण ही मानवी विकासाची क्षमता संस्कृतीने व्यक्त केलेली आहे. व्यक्तिगत जीवनात आध्यात्मिक पातळ्यांचे विविध स्तर गाठत माणूस प्रगतिपथावर जाऊ शकतो. सामूहिक जीवनात मात्र जो अंत:करणातून माणसाला समत्वाने आणि ममत्वाने वागवू शकेल तोच नारायण पदापर्यंत जाऊ शकतो. भारतमातेला स्वतंत्र करताना केवळ तिचे राजकीय स्वातंत्र्य वीर-हुतात्म्यांना अभिप्रेत नव्हते, याचे भान सार्वजनिक जीवनात आम्ही जोपासले पाहिजे. स्वातंत्र्याचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानसिक, सांस्कृतिक हे सर्व पैलू स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षामध्ये तरी आपण समजाऊन घ्यावेत. त्याचे प्रतिबिंब आपल्या दैनंदिन जीवनातून व्यक्त व्हावे. ते होत नाही म्हणूनच तर मायमाऊली आपल्याला कळकळीने सांगते  

लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरु नका।।

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, क्रांतिदिनाच्या निमित्ताने ही वर्तनक्रांती घडवून आणण्याची प्रेरणा सामान्य माणसाने जोपासली तर ‘स्वराज्य महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ हे अभियान अधिक अर्थपूर्ण होईल. कदाचित मातृभूमीचे हेच मागणे असावे.  

प्रा. डॉ. वृंदा देशपांडे – जोशी

    सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय.       

   

                                                           


Sunday, 3 July 2022

ने मजसी ने परत मातृभूमीला... (आजच्या संदर्भात)



                                                                                           जागर स्वातंत्र्याचा 







ने मजसी ने परत मातृभूमीला...

(आजच्या संदर्भात)

     पुनश्च हरि ॐ म्हणल्यानंतर आता राहिलेल्या सर्वच कामांना पुन्हा एकदा हाती घेतलेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये ‘जागर स्वातंत्र्याचा’ या नावाने ब्लॉग लेखन सुरू केले होते. त्यात आत्तापर्यंत पाच स्वातंत्र्यपर कवितांचे विवेचन आपण वाचलेले आहेत. शेवटच्या ब्लॉगमध्ये आपण भेटलो होतो, कुसुमाग्रजांच्या पुण्यतिथीनिमित्त अर्थात १० मार्च २०२२ रोजी. ‘बलसागर भारत होवो’ या साने गुरुजीच्या गीताचे विश्लेषण त्या वेळी केले होते. आज त्यापुढील सहावा ब्लॉग लिहित आहे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला...’ या वि. दा. सावरकरांच्या गीतावर.

‘ने मजसी ने’ या गीताच्या शब्दांची नुसती आठवण जरी झाली तरीसुद्धा आठवणींमध्ये चढाओढ लागते, कोणत्या आठवणीने आधी यायचं?सावरकरांचे व्याकूळ शब्द’,  ‘मंगेशकर भावंडांचं गीत-संगीत’ की या कवनाने जागी होणारी राष्ट्रभक्ती,  पराक्रमाची आस... भारतमातेच्या प्रेमाने उचंबळून येणाऱ्या संवेदनशील मनात या सगळ्या भावभावनांच्या लहरी संमिश्रपणे धावत येतात. मनाच्या संमिश्र अशा भावविभोर  अवस्थेमध्ये आपण हरवून जातो. १९०९ मध्ये जिथे हे गीत लिहिलं गेलं त्या ब्रायटनच्या समुद्रकिना-याहून आपल्या मनाचा एक प्रवास सुरु होतो. या गीतामध्ये रममाण होताना माझ्या मनानेही असाच प्रवास केला थेट १९०९ पासून २०२२ पर्यंत. अर्थात पारतंत्र्याच्या काळापासून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवापर्यंत ! भूतकाळाच्या गौरवात आणि भविष्यकाळाच्या चिंतेत न हरवता 'वर्तमान क्षणात  जगा'  हा मंत्र देणा-या भारतीय संस्कृतीला वंदन करत, या गीताच्या पूर्वीच्या आवश्यक संदर्भासहित आजच्या संदर्भात चिंतन व्यक्त करण्याचा प्रयत्न करते.

राष्ट्रभक्त, विज्ञाननिष्ठ, साहित्यिक, क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर आपल्या सर्वाना सुपरिचित आहेत.  स्वातंत्र्यपूर्व काळात प्राण पणाला लावून, उदात्त ध्येय उराशी बाळगून परकीयांसोबतच स्वकीयांचाही विरोध पचवत, मोडीत काढत स्वत:च्या बुद्धीला पटलेल्या आणि हृदयाने साद घातलेल्या मार्गावर अढळ निष्ठेने ते अविरत चालत राहीले. स्वातंत्र्योत्तर काळातही स्वत:च्या वाट्याला आलेल्या उपेक्षेची त्यांनी उपेक्षा केली. निर्भीडपणाने आणि निरमोही मनाने राष्ट्रहिताचे कृतिशील विचार त्यांच्या जीवनातून अभिव्यक्त होत राहीले. ते नितळपणाने समजून घेण्याची आवश्यकता आहे.

त्या काळाचा विचार करता लक्षात येते, स्वातंत्र्य मिळवायचेच या विचाराने भारलेले युवक परदेशातून स्वदेशाच्या भवितव्यासाठी स्वत:चे सर्वस्व झोकून देत होते. ‘पारतंत्र्यात राहणं मान्य नसणं हा गुन्हा नसून गौरवाची गोष्ट आहे’ असे मानणाऱ्या लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ मधून हे क्रांतिकार्य सुरू होते. मदनलाल धिंगरा, सेनापती बापट, सावरकर, वीरेन्द्रनाथ चटोपाध्याय इत्यादी क्रांतिकारक इथून कार्यरत होते. सावरकरानी भाषांतरित करून पाठवलेले जोसेफ मॅझेनीचे आत्मचरित्र सरकारसाठी प्रक्षोभक ठरले. मदनलाल धिंगरा यांनी केलेल्या करझन वायलीच्या हत्येने इंग्रजांची करडी नजर वाढली आणि लोकमतही विरोधात गेले. वि. दा. सावरकरांनी मदनलालच्या निषेधाला विरोध केल्यामुळे सर्वांच्या वक्र नजरा सावरकरांकडे वळल्या. बाबाराव सावरकरांकडे बॉम्बस्फोटाच्या साहित्याची भाषांतरित प्रत सापडल्यामुळे इतर आरोपांसह त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. भारतातल्या क्रांतिकार्यात सुसूत्रता आणून त्याची सूत्रे लंडनमधून हलवण्याची शक्यता संपुष्टात आली. कुटुंबाची वाताहत, विरोधी लोकमत, राष्ट्रकार्याची हानी, शत्रूच्या हातात सापडून परदेशात अडकून पडण्याची शक्यता या सर्व प्रतिकूल आघातांनी मातृभूमीच्या विरहाची व्याकूळ साद, ‘ने मजसी ने’ या काव्यातून व्यक्त होते. 

‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ या गीतामधून सावरकरांनी सागरावर व्याकूळ अंत:करणाने वचनभंगाचा आरोप केलेला आहे. जणू काही सागराने परत मातृभूमीत आणण्याच्या बोलीवर सावरकरांना परदेशात नेले. मात्र ही शक्यता नाहीशी झाल्यावर पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटाची किंवा पारध्याच्या जाळ्यात अडकलेल्या हरणाची हतबलता सावरकरांनी अनुभवली. परतीच्या साऱ्याच शक्यता संपुष्टात आल्याने त्यांना दाही दिशांना अंधाराचे साम्राज्य भासले. आपला हा विरह संपवून सागराने आपल्याला मातृभूमीकडे परत न्यावे यासाठी नदीची शपथ ते सागराला देतात. नदीच्या विरहाने सागराच्या अस्तित्वावरच गदा येईल त्या विरहाच्या कठोर शपथेलाही सागराने दाद दिली नाही. तेंव्हा सागराच्या फेसाळत्या लाटा पाहून हा जणू काही आपली खिल्ली उडवत निर्दय हास्य करत आहे, असे सावरकरांना वाटते. आणि मग मात्र विनंती करणा-या सावरकरांची भूमिका आक्रमक होते. ‘आंग्लभूमी-भयभीता’ अशी सागराची निर्भत्सना करत, अगस्ती ऋषी तुला पुन्हा धडा शिकवतील अशी धमकी ते सागराला देतात. 

मी जेंव्हा आजच्या संदर्भात या काव्याचा विचार करते तेंव्हा मला वाटते, सावरकरांची मातृभूमीकडे परतण्याची ही व्याकूळ ओढ आपल्यापैकी प्रत्येकाला लागली पाहिजे. सावरकरांनी सागराला विनंती केली होती, ती आपल्याला ‘भवसागरा’ला करावी लागेल.  

ने मजसी ने परत मातृभूमीला

भवसागरा प्राण तळमळला

अशी व्याकूळ साद घालावी लागेल. कदाचित या ओळींनी कोणी गडबडून जाईल. कोणाला वाटेल या ओळी NRI साठी वापरायच्या असतील. कारण   भारतामध्ये राहूनच जर आम्ही आमचे जीवन जगतो आहोत तर ‘परत मातृभूमीला ने’ असे म्हणण्याचे कारण काय ?

वास्तविक पाहता आपण भौतिक आणि भौगोलिक दृष्ट्या भारत नावाच्या भूमीवर राहत असलो तरी सांस्कृतिक दृष्ट्या या मातीशी असलेली  आपली  नाळ तुटत चाललेली आहे, हे कटू सत्य आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत दिसणारा केवळ राजकीय नकाशा म्हणजे भारत नव्हे. ‘भारत’ हे सर्वसमावेशक असे एक ‘सांस्कृतिक अस्तित्व’ आहे. मानवतेने जी गौरवाने जोपासावी अशी ‘भारत एक अस्मिता’ आहे. ज्याचा मागोवा आणि मार्गदर्शन घेत मार्गक्रमण करावे असे ‘भारत एक संचित’ आहे. शांततेने आणि सौहार्दाने जिथे नांदता येईल असे अखिल विश्वाचे ‘भारत एक भवितव्य’ आहे. हे भारताचे अलंकारिक वर्णन नव्हे. तर चंगळवादाच्या मस्तीत आणि दारिद्रयाच्या खाईत आम्हाला अनाकलनीय राहणाऱ्या भारताचे वास्तव आहे. म्हणूनच भवसागराला विनंती आहे -   

ने मजसी ने परत मातृभूमीला

भवसागरा प्राण तळमळला

सावरकर राजकीय पारतंत्र्याच्या काळात परक्या देशात प्रत्यक्षात अडकले होते, म्हणून त्यांची तळमळ आपण समजून घेऊ शकतो. राजकीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या काळात पण अद्यापही न ओसरलेल्या आत्मिक पारतंत्र्याच्या भरात स्वत:ची तडफड देखील आम्हाला जाणवत नाही, असे बधीरपण स्वीकारून आम्ही विकासाच्या गप्पा मारत जगतो आहोत. कृत्रिम लखलखाटात मंदावत जाणाऱ्या अंतरातल्या नंदादीपाचे आम्हाला भान नाही. मातृभूमीच्या विरहाने दशदिशा तमोमय वाटणारे, उंच प्रासादांपुढेही आईची झोपडी प्रिय वाटणारे वि. दा. सावरकर लिहितात - 

गुण-सुमनें मी वेचियली या भावें । की तिने सुगंधा घ्यावें


जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा

शिकली – सवरलेली, सुशिक्षित आणि सुसंस्कृत देखील म्हणवली जाणारी आम्ही माणसे असा अगणित व्यर्थ भार वाहतो आहोत, ओझ्याच्या जाणिवेशिवाय ! ही जाणीव जेंव्हा आम्हाला होईल तेंव्हा व्यर्थ ओझे टाकून अर्थपूर्ण, उद्धारक जीवन आपण जगू शकू. ही जाणीव तीव्रतेने होण्यासाठी मातृभूमीकडे परतण्याची ही व्याकूळ ओढ आपल्यापैकी प्रत्येकाला लागली पाहिजे.     

 

मातृभूमीकडे परतायचे म्हणजे काय ?

     मातृभूमीकडे परतायचे म्हणजे काय ? या प्रश्नाचे साधे-सोपे उत्तर आहे, ‘भारतीय’ व्हायचे. कागदोपत्री आपली नोंद भारतीय म्हणूनच आहे. मात्र दुर्दैवाने आजही आपली मानसिकता ‘वसाहतीकरणाची मानसिकता’ म्हणून ओळखली जाते. पारतंत्र्याच्या काळाने इंग्रजी राजवटीला आवश्यक तेवढा भौतिक विकास आपल्याला दिलेला असला तरी त्याच्या कैक पटीने आपले मानसिक खच्चीकरण केलेले आहे. न्यूनगंडाने पछाडलेले आपण भारतीय दृष्टिकोनातून, भारतीय पद्धतीने जीवन जगायचे म्हणजे मागासलेपणा मानायला लागलो. हातचे आणि पारंपरिक हक्काचे  सोडून पळत्याच्या पाठीमागे चालताना आपणच आपली त्रिशंकू अवस्था करून घेतली. ‘न घर का; न घाट का’ या स्थितीत आपल्याला सुयोग्य स्वाभिमान, अस्मिता या साऱ्यांचा विसर पडला. घाबरत, दबकत जगताना माझे मत काय, माझी भूमिका काय, कोणत्या मूल्यांशी आणि तत्त्वांशी माझी बांधिलकी आहे, याच्या निश्चिती अभावी काय स्वीकारावे आणि काय नाकारावे याचे भान आणि हिंमत आम्ही हरवून बसलो. ते धैर्य आम्हाला मिळावे म्हणून, ‘ने मजसी ने परत मातृभूमीकडे..’                  

मनाचे सामर्थ्य जोपासणे आणि या सामर्थ्याने पोलादी शरीर घडवणे ही भारताची सवय आहे. मनाच्या अफाट सामर्थ्याने पोलादी शरीर घडवण्याची ताकद इथल्या लोकांमध्ये आली. या मन:शक्तीने देशभक्ती करणे आणि विश्वकल्याण साधणे हा भारताचा स्वभाव झाला. आम्हाला मनोभावे त्याचे पाईक होता आले पाहिजे, इतकेच. ज्या आध्यात्मिकतेच्या पायावर भारतीय संस्कृती दृढपणाने उभी आहे, ती यापेक्षा निराळी असेल, असे वाटत नाही.  

ही माय निजपदा लाहो;बलसागर भारत होवो

हे साने गुरुजींचे मागणे मागच्या लेखात आपण जाणून घेतले होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ने मजसी ने ...

प्रा. वृंदा देशपांडे – जोशी, मराठी विभाग,

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद.  

Thursday, 10 March 2022

बलसागर भारत होवो - साने गुरुजी

 

बलसागर भारत होवो - साने गुरुजी


समूहगान सादर करताना ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’.


        
खरं म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या आधीच हा लेख प्रसिद्ध व्हायला हवा होता. कारण जानेवारी महिन्यातला हा ‘स्वातंत्र्याचा जागर’, पण बाकी व्यस्ततेमध्ये कुठेतरी मागे पडला. व्यस्तता कितीही असली तरी नियोजित कामे ठराविक वेळी होणं आवश्यक असतं. त्यामुळे माझ्या रसिक वाचकांची क्षमा मागून मी साने गुरुजींच्या या स्वातंत्र्यपर गीताकडे वळते.


            
साने गुरुजी म्हणजे,  ‘भारतीय सत्शीलतेचं मूर्तिमंत रूप’ वाटतं मला. साने गुरुजींनी इथल्या सामान्य माणसाचा, या देशाचा, या संस्कृतीचा इतका व्यापक आणि सूक्ष्म विचार केलेला आहे; शिवाय इतक्या साध्या सोप्या शब्दांमधून व्यक्त केलेला आहे की त्याला खरोखरच तोड नाही. मला वाटतं मराठी साहित्यामध्ये सोपं कसं लिहावं, असा प्रश्न पडला तर कितीही शतके उलटली तरी एकच नाव अग्रक्रमाने पुढे येतं आणि ते म्हणजे 'साने गुरुजी'. साने गुरुजींच्या कथा असोत, कविता असोत, जनमानसाने आळवलेली गीतं असोत किंवा कादंबऱ्या असोत त्यांच्या आंतरिक हाकेतून येणारा सघन, आशयगर्भ साधेपणाअभिव्यक्तीतला सोपेपणा थेट मनाला हात घालणारा.


         
ज्या ज्या वेळेला साने गुरुजींच्या ‘बलसागर भारत होवो’ या गीताचा विचार होईल, तेव्हा हे गीत जणू काही आत्ताच आणि आजच्या काळासाठी लिहिले आहे, असे वाटावे, इतके ते जीवंत, रसरशीत आणि कालसुसंगत वाटते. साने गुरुजी यांचे साहित्य, त्यांचा काळ आणि त्यांचे संदर्भ हे जवळपास आपल्याला माहिती आहेत. नवी पीढीही आपल्या पुस्तकांमधून, गुगल गुरुकडून  ते माहीतही करून घेऊ शकते. त्यामुळे माहितीचा हा तपशील वगळून या गीतातून कालसुसंगतता शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न करावा वाटतो आहे. तो याठिकाणी करून पाहते.

 


बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो |

मुळामध्ये भारताने बलसागर व्हायचं म्हणजे काय? याचा विचार मी करत होते. त्यावेळेला मला जाणवलं, 'ज्ञानाधिष्ठित भक्ती हे भारताचे वैभव आहे'. ज्ञानाधिष्ठित भक्ती हेच भारताचं खरंखुरं आत्मबळ आहे. ‘सृष्टी, समष्टी आणि परमेष्टी’ यांचा मेळ घालून समतोल साधत, जगा आणि जगू द्या’ हे तत्त्व अवलंबत समाधानी वृत्तीने जगणारा भारत आजच्या काळातही विश्वाचा आधार होऊ शकतो. पण तो कसा? यानिमित्ताने थोडा विस्ताराने विचार करूयात.


             
अर्थात सानेगुरुजींनी पुढे स्पष्ट केलेले आहेच  


हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो ||

म्हणजेच ‘जिंकू किंवा मरू’,  ‘करा किंवा मरा’,   Do or die  असं हे गणित आहे. कंकण करि बांधियले म्हणजे व्रत घेतले. व्रत काही भारताला नवीन नाही. आमच्या लोकपरंपरेतल्या, सामान्य माणसाच्या जीवनातल्या अनेक व्रतकथा असतील,  किंवा आर्य चाणक्यांसारखी, व्यक्तिगत जीवन आणि राजकीय जीवनात कार्य करतांना अगदी तेलाचा दिवा बदलणारी ‘व्रतस्थ’ माणसं असतील किंवा 'न घेतले हे व्रत आम्ही अंधतेने', असे म्हणणारे कृतिशील सावरकर असतील, विवेकाच्या बीजातून घेतलेले व्रत आमच्या जीवनाचे मूल्य होते, निष्ठावंतपणे आम्ही ते पाळत जातो आणि त्यातून   सर्वकल्याणकारी कृती साकारली जातेहा भारताचा अनुभव आहे. परंपरेचे प्रेरणादायी संचित आहे.


           
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हे तर आमच्या परंपरेचे ब्रीद आहे. आणि म्हणूनच थेट अकराव्या - बाराव्या शतकापासून जनसेवेच्या माध्यमातून भारतामध्ये उद्बोधन - प्रबोधन फार मोठ्या प्रमाणावर  घडवून आणलेले दिसते. भक्ती चळवळीचा विचार केला तर लक्षात यायला लागतं ‘बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणुनी कळवळा येत असे’ अशा आंतरिक तळमळीतून आमच्या सर्व संतांनी कार्य केलेले आहे. हे कार्य करताना, समाजाचा विरोध, प्रतिकूलता, समाजाची संकुचित दृष्टी आणि नेतृत्वाची विशाल दृष्टी यांच्यामधला संघर्ष याने जे काही अंतर निर्माण केलेलं होतं, या अंतरामुळे फार मोठ्या प्रमाणावर संतांची आणि समाजसुधारकांची ससेहोलपट झालेली आपल्याला दिसून येते. त्यातूनच मग ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’,  ‘चणे खावे लोखंडाचे तेंव्हा ब्रह्मपदी नाचे’ अशा प्रकारची उद्धरणे हा आमच्या समाजधारणेचा एक भाग बनलेली दिसून येतात.

पण यामुळे आपण जनसेवा सोडून दिली आहे का ? आजही अशी अनेक  माणसं, संस्था, संघटना आहेत जी या जनसेवेला सर्वस्व मानतात. ‘जनसेवा’ ही एक प्रवृत्ती असल्याचा प्रत्यय देतात. अशाच एका संस्थेला भेट देण्याचा योग ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्ताने आला होता. ती संस्था म्हणजे ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ’. प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलेले असले तरी दिवाकर दादांमुळे या संस्थेबद्दलची जी आपुलकी, आस्था आणि आदर मनात आपसूक निर्माण झालेला आहे; त्यातून या कार्यक्रमाशी प्रेक्षक म्हणून मी कधी एकरूप झाले, ते मलाच कळले नाही. सूत्रसंचालकांचे थक्क करणारे सूत्रसंचालन, ही स्पर्धा आहे, याचे भान विसरून आनंदाच्या पातळीवर घेऊन जाणारे कलाकारांचे सादरीकरण, हेडगेवार रुग्णालयातील त्या सभागृहाला लाभलेले मूल्यनिष्ठ, ध्यासयुक्त निखळ आनंदाचे वातावरण... मला स्वर्ग दोन बोटे उरला होता. त्या दिवशी कुसुमाग्रजांची शपथ घेऊन मी जाहीर केले, “माझ्या आजवरच्या आयुष्यात एवढा सुंदर मराठी राजभाषा दिन मी अनुभवलेला नाही.”

पण इथे मला अशा अननुभूत आनंदाची प्रचिती का यावी? मी जरा शोधत गेले आणि मला गवसले, या संस्थेने गेल्या तीन दशकांपासून जे निरामय जनसेवेचे व्रत घेतलेले आहे, त्याचा हा परिपाक आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना’. एखाद्या कार्यामधून ईश्वरी आनंदाचा प्रत्यय येतो, तो कार्यकर्त्यांच्या समर्पित वृत्तीमुळे. १९८९ मध्ये आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक लक्ष सेवाकार्य उभे राहतील, असा संकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामातून प्रेरणा घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील काही तरुण डॉक्टरानी स्वतःचा खाजगी व्यवसाय सुरू न करता वैद्यकीय क्षेत्रात सेवा देण्याचे निश्चित केले. त्यातून १९८८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान स्थापित झाले. या मार्फत चालणाऱ्या संस्था, प्रकल्प, उपक्रम कार्यकर्त्यांच्या समर्पित वृत्तीचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. १९८९ मध्ये मिलिंदनगर या सेवा वस्तीमध्ये ‘गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र’ उभे करण्यात आले. आज ६० सेवा वस्त्यांमध्ये ०३ आरोग्य केंद्र आहेत. ग्रामीण भागातील विस्तार कार्यासाठी एक स्वतंत्र विश्वस्त व्यवस्था म्हणून १९९४ मध्ये ‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’ची स्थापना झाली. त्या अंतर्गत खालील सहा प्रमुख क्षेत्रात कार्य केले जाते.

·      आरोग्य व आरोग्य लोकशिक्षण

·      शाश्वत ग्रामविकास

·      बाल शिक्षण व अनौपचारिक शिक्षण

·      कौशल्य विकसन

·      नैसर्गिक संसाधन विकास

·      आपत्ती सहाय्य

आज महाराष्ट्रातल्या ०५ जिल्ह्यांमधील  २७० गावांमध्ये या संस्थेच्या माध्यमातून अनेकविध उपक्रम, प्रकल्प राबवले जातात. महिलांचे सक्षमीकरण, विद्यार्थी विकास प्रकल्प, किशोरी विकास प्रकल्प, श्रीगुरुजी चलचिकित्सालय, जलसंवर्धन आदी विविध कार्यांना समाजाचा मोठा व्यापक पाठिंबा मिळालेला आहे.

समाजाने स्वतःच्या समस्या स्वतः सोडवाव्यात, परस्पर सहकार्याने सोडवाव्यात म्हणून हे कार्य सुरू झाले. संस्थेच्या कामाचा आधार घेऊन स्वतःचे  जीवन उन्नत केलेले आणि स्वतःच्या कार्य कौशल्याचे योगदान देणारे अनेक  कार्यकर्ते इथे जीव ओतून काम करतात. त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून ‘वारसा लोकसंस्कृतीचा’ सांगणारे ‘देवगिरी रेडिओ केंद्र 91.2 हे या वर्षी २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे. भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा, ते जनतेपर्यंत साध्या-सोप्या भाषेतून जावे, लोकसंस्कृती रुजावी, कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख व्हावी अशा उद्देशानी देवगिरी रेडिओ केंद्र  कार्यरत आहे.

भारताने बलसागर व्हायचं म्हणजे काय करायचे ? हा विचार जानेवारी महिन्यापासून ब्लॉग लेखनाच्या निमित्ताने माझ्या मनात घोळत होता. मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या वरील कार्यक्रमात नेमके साने गुरुजींचे हे गीत समूहगान म्हणून  गायले गेले. तिथे केवळ शब्दांचा नव्हे तर मूर्त रूपाने या गीताच्या अर्थाचा प्रत्यय आला. सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीदिनी आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी व्यापक संवेदनशीलतेने, सामाजिक बांधीलकेने चालणाऱ्या या संस्थेच्या कार्याची छोटीशी ओळख मला करून देता आली, यासारखा आनंद नाही. 

सानेगुरुजी पुढे गीतात म्हणतात,

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पिन तिमीर घोर संहारीन,

या बंधु सहाय्याला हो

      हातात हात घेऊन, हृदयास हृदय जोडून, ऐक्याचा मंत्र जपून,

या कार्य करायाला हो

‘सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळा’त हा आत्मीयतेचा  कार्यानंद आपण अवश्य घेऊ शकतो. सहभागी होऊ शकतो. याबाबत अधिक माहिती या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री विजय उकलगावकर देऊ शकतील. (संपर्क क्रमांक – 7875555944). 

     कोरोनाच्या काळाने जीवनातला साधेपणा, जीवनातली प्रामाणिकता याकडे आपण पुन्हा एकदा बघायला लागलो आहोत. भारताच्या दृष्टीने मला ही फार सकारात्मक बाब वाटते. भारतीयांसाठी ‘राष्ट्र’ ही केवळ भौगोलिक किंवा राजकीय नव्हे तर एक सांस्कृतिक संकल्पना आहे. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून, सर्वस्वाचा होम करून समाजाच्या कल्याणासाठी झटणारी माणसं भारतात आजही  आहेत. आणि या माणसाप्रती सामान्य माणसाचा असलेला विश्वास भारतीय  वैभवाचा आधार आहे.

साने गुरुजी, आपण या गीतातून मागणे मागीतलेत -

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ

विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

बलसागर भारत होवो

भारताचा प्रत्येक नागरिक या व्रताशी एकनिष्ठ आहे.

वृंदा आशय     



 

मागणं हिंददेवीकडे !

  मागणं हिंददेवीकडे ! देवीचे नवरात्र सुरू आहेत. आज नवरात्रातली अष्टमी. अहोरात्र जागरण होणार. देवीपुढे  गोंधळ सादर केला जाणार. प्रत्येकाच...